ट्रक धडकेत महिला ठार; पाच वर्षांचा मूल बचावला

0

पिंपळे गुरव येथील घटना : ट्रक चालकाला अटक

पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव येथे ट्रकच्या धडकेत एका विवाहितेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. दोघेही भावासोबत दुचाकीवरून जात होते. ही घटना मंगळवारी (दि.6) रात्री साडे आठ वाजता घडली. प्रज्ञा विक्रांत वाघमारे (वय 30, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) तिचे नाव असून त्यांचा मुलगा विहान (वय 5) किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी प्रज्ञा यांचे भाऊ दुचाकीचालक पंकज विलास कांबळे (वय 40, रा. मरकळ रोड, आळंदी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हे बहीण प्रज्ञा व भाचा विहान यांना दुचाकीवरून प्रज्ञा यांच्या घरी सोडण्यास जात होते. यावेळी ट्रकने (एमएच 42 टी1402) पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगरमध्ये त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये ट्रकचे चाक प्रज्ञा यांच्या अंगावरून गेले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. तर विहान व कांबळे हे किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी ट्रक चालक निलेश पंडित पठारे (वय 24, रा. खांडवी, अहमदनगर) याला अटक केली आहे.