नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार का पुन्हा वाढविण्यात येणार? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये करोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान सर्वत्र सरसकट लॉकडाऊन न ठेवता ज्या भागात कोरोनाचा प्रादूर्भाव जास्त आहे. तो भाग वगळता अन्य भागात काही प्रमाणात शिथिलता देण्यावर केंद्र व राज्य सरकार विचार करत आहे.
कोविड-१९ साठी बनवण्यात आलेल्या विशेष मंत्रिमंडळ गटाची मंगळवारी एक बैठक पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या गटानं गाड्यांसाठी ऑड-इव्हन लागू करण्याविषयी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये लोकांची संख्या निश्चित करण्याचे पर्याय सूचवले आहेत. याशिवाय कारमध्येही किती लोक असावेत, या संख्येवर मर्यादा येऊ शकते. मॉल आणि शाळा १५ मेपर्यंत बंद ठेवण्याची सूचनाही या मंत्रिमंडळ गटाने केली आहे. धर्मस्थळांवर बंदी कायम राहू शकते. करोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेले १३ राज्यांतील ६० जिल्हे १४ मेनंतरही कमीत कमी दोन आठवड्यांकरता पूर्णत: लॉकडाऊन राहतील, अशीही शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे. यात जिल्हा बंदी कायम राहील तसेच काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु होण्याची शक्यता आहे. यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देखील अनुकुल असल्याचे सांगण्यात येत आहे.