पुणे :- ११ मे रोजी पुण्यातील खराडी बायपास रोडवर महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन यात पंकज खुणे (वय 26, रा.वर्धा) व प्रियंका झगडे (वय 24, सातारा) हे दोघे गंभीररीत्या भाजले होते. पंकजवर वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असताना पंकजचा शुक्रवारी (15 जून) तर आज प्रियंकाचा शनिवारी (16 जून) सकाळी मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूनंतर एकच प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे यामध्ये दोघांची काय चूक होती.
चहा पीत असतांना झाली दुर्घटना
खराडीतील झेन्सार आयटी पार्कमधील ट्रायमॅक्स या कंपनीत प्रियंका आणि पंकज कामाला होते. हे दोघे सायंकाळी ट्रान्सफॉमरच्या शेजारी असलेल्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळेस अचानक ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट होऊन ट्रान्सफॉर्मर शेजारील स्टॉलवर चहा पीत असलेले पंकज आणि प्रियंका यामध्ये गंभीररीत्या भाजले होते. दोघांच्याही घरची हलाखीची परिस्थिती असल्याने पंकजला वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले होते तर प्रियंकावर सुर्या हॉस्पीटमध्येच उपचार सुरू होते. उपचाराकरिता प्रियांकाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मंत्रालयात चकरा मारल्या पण हाती काही लागले नाही. साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने थोडीफार मदत झालीही, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर आज (16 जून) पहाटे 6.30 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. पंकज काही सहा महिण्यापुर्वी तो पुण्यात आला होता आणि ट्रायमॅक्स कंपनीत कामाला लागला होता.
या घटनेतून महावितरणाने अंग काढून घेत यात सॅन्डविचच्या स्टॉलला आग लागल्याने दुर्घटना घडल्याचे महावितरणने म्हटले आहे. या आगीमध्ये महावितरणचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याच्या कारणावरून संबंधीत स्टॉलधारकाविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र महावितरणचा हा अहवाल धाधांत खोटा असल्याचा आरोप प्रियंका आणि पंकजच्या नातेवाईकांनी केला. आपली चूक झाकण्यासाठी महावितरण खोटा अहवाल देत असल्याचा आरोप त्यांनी केला.