पुणे । महापालिकेच्या सुरक्षा विभागाने 1 ऑगस्टपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 130 ट्राफिक वॉर्डना कामावरून काढून टाकले आहे. मात्र, महापालिकेने त्यांच्या सुरक्षारक्षक विभागात सामावून घ्यावे या मागणीसाठी सर्व वॉर्डनी बुधवारी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यांना महापालिकेच्या सुरक्षारक्षक विभागात परत घेण्याविषयी विचार करू, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकार्यांनी दिले.
हे सर्व वॉर्डन ‘पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ’ या अधिकृत एजन्सीकडून दहा वर्षापूर्वी घेण्यात आले होते आणि त्यांना महापालिकेकडून पगार देण्यात येत हेाता. मात्र, गेल्या दोन वर्षापासून महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने त्यावर आक्षेप घेतला होता. यावर्षी तर त्यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूदही करण्यात आलेली नाही. म्हणून एक महिन्याऐवजी केवळ तीन दिवस आधी नोटीस देऊन एक ऑगस्टपासून सर्व वॉर्डनना काढून टाकण्यात आले असून सध्या ते बेरोजगार आहेत. त्यांचा अद्याप एक महिन्याचा पगारही बाकी आहे. त्यांनी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीचे संघटक किशोर काळे व राम अडागळे यांनी सहायक कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांच्याशी चर्चा केली.
यावेळी महापालिकेचे सुरक्षा अधिकारी उमेश माळी, सुरक्षारक्षक मंडळाचे सचिव एस. साळूंके, वाहतूक पोलिसांच्या वतीने शिवाजीनगर डिव्हिजनचे उपनिरीक्षक प्रदीप जाधव हे उपस्थित होते. सर्व ट्राफिक वॉर्डना महापालिकेने त्यांच्या दवाखाने, उद्याने या ठिकाणी सुरक्षारक्षकांमध्ये परत सेवेत घ्यावे, अशी मागणी संघटक काळे यांनी केली. त्यावर महापालिकेचे सुरक्षारक्षक अधिकारी माळी यांनी त्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.