‘ट्राय’च्या दरवाढील केबल असोसिएशनचा विरोध

0

पुणे : नववर्षापासून केबल ग्राहकांना प्रत्येक वाहिनीसाठी 50 पैशांपासून ते 19 रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागणार आहे. दि टेलिकॅम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या नवीन नियमांनुसार हे दर निश्‍चित करण्यात आले असून यामुळे ग्राहकांची सेवा महागाणार आहे. तसेच, ट्रायने ग्राहक आणि केबलचालक यांना विचारात न घेता दर वाढविल्याचे सांगत पुणे केबल ऑपरेटर्स असोसिएशनने याचा विरोध केला आहे. यासंदर्भात असोसिएशनच्या प्राची शहा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील जगताप, ज्ञानेश्‍वर फडतरे, अजय पुंडले उपस्थित होते.

महिन्याला 130 रुपये भाडे

केबल सेवा घेणार्‍यांना आता महिन्याला 130 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. यामध्ये फक्त 100 वाहिन्या मोफत मिळणार आहेत. मात्र, इतर वाहिन्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय त्या रकमेवर सेवाकरही भरावा लागणार आहे, असे प्राची शहा यांनी पुढे बोलताना सांगितले. कोणालाही विश्‍वासात न घेता, चर्चा न करता ग्राहक व केबल ऑपरेटरवर ही नियमावली लादण्यात आली आहे. नव्या नियमावलीमुळे ग्राहक किंवा केबल ऑपरेटर या दोघांचाही आर्थिक फायदा नसून चॅनल ब्रॉडकास्टार आणि मल्टी सर्व्हिस ऑपरेटर यांचा फायदा आहे, असे सांगत या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी शहा यांनी दिली.