पहूर पोलीस व ट्रॅक्टर मालकांची कामगिरी; तपासणी पथक राजस्थानकडे रवाना
पहूर । येथील शेतकरी अशोक अमृत बनकर यांच्यासह सुनिल शामराव पाटील (देव पिंप्री) व सुनिल शिरसाठ, जामनेर यांचे प्रत्येकी एक ट्रॅक्टर गेल्या वर्षी मार्च महिन्यात चोरी गेले होते. या प्रकरणातील मुख्य फरारी आरोपीस 10 मार्च रोजी पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेज परिसरात अटक करण्यात पहूर पोलीसांना व ट्रॅक्टर मालकांना यश आले. पुढील तपासासाठी आज पथक आरोपीसह राजस्थान कडे रवाना झाले.
अशी झाली कारवाई
गोपनिय माहितीच्या आधारे पहूर पोलीस ठाण्याचे सपोनि मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अरूण वाणी, श्रीराम धुमाळ हे कर्मचारी व मधुकर अशोक बनकर, सुनिल शिरसाठ, सुनिल पाटील हे सर्वजण पुण्यात पोहचले. मोबाईल लोकेशनद्वारे त्यांनी आरोपीचा माग काढला. सागर हरिश्चंद्र वाजोळ (वय-24) रा. बोरगाव, ता.चिखली जि. बुलढाणा यास त्याच्या ताब्यातील इंडिगो टॅक्सी क्र.(एमएच 12 एनएक्स 1480) मधून पळून जात असताना 15 किलोमिटर पाठलाग करून एखाद्या चित्रपटाला लाजवेल अश्या पध्दतीने अखेर फर्ग्यूसन कॉलेजजवळ सिग्नल पडला आणि मधूकर बनकर यांनी धाडसाने आरोपीच्या गाडीची काचा फोडून त्यास पकडले व पोलीसांनी लगेचच त्यास ताब्यात घेतले.
पथक राजस्थानकडे
गेल्या वर्षी 3 मार्च रोजी मधुकर बनकर आणि सुनिल पाटील यांचे 12 मार्च रोजी तर शिरसाठ यांचे 17 मार्च रोजी ट्रॅक्टर चोरी गेले होते. दरम्यान धुळे जिल्हयातील शिरपुर येथे श्री.बनकर यांच्या ट्रॅक्टरचे ट्राली मिळाली होती. वर्षभरानंतर या प्रकरणी गुप्त माहीती पहूर पोलीस व ट्रॅक्टर मालकांना मिळाली, त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली. आरोपीस जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीने मुद्देमाल राजस्थानात विकले असल्याचा संशय व्यक्त होत असून पुढील तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे यांचे पथक ट्रॅक्टर मालकांसह आज राजस्थानकडे रवाना झाले असून पुढील कारवाईकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे. या धाडसी कारवाईमुळे पहुर पोलीसांचे कौतूक होत आहे.