भुसावळ। रेल्वे रुळावर गिट्टी टाकणारी ट्रॅक मशीन अचनाकपणे रुळावरुन घसरल्याची घटना शुक्रवार 5 रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास बोदवड- खामखेडा स्थानकादरम्यान घडली. यामुळे नागपूर-मुंबई दरम्यानची प्रवासी व मालवाहतूक वाहतूक विस्कळीत झाली. ट्रॅक मशिन पुर्ववत करण्यासाठी भुसावळ येथून रेल्वे कर्मचार्यांचे पथक नियुक्त करुन ते रवाना करण्यात आले होते. या पथकाद्वारे रेल्वे रुळ व्यवस्थित करुन मशिन मार्गस्थ झाली. यामुळे रेल्वेची रखडलेली वाहतुक सुरळीत करण्यात आली.
अधिकारी नियंत्रण कक्षात हजर
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे रुळालगत गिट्टी टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी ट्रॅक मशिनद्वारे गिट्टीची वाहतुक करीत असताना ट्रॅक मशीन रुळावरुन घसरली. हि मशिन रुळावरुन घसरल्याचे समजताच येथून तातडीने अॅक्सीडेंट रिलिफ ट्रेन रवाना झाली याशिवाय सर्व सबंधित अधिकारी तातडीने डीआरएम कार्यालयातील नियंत्रण कक्षात हजर झाले.
मलकापूर जवळ घडली घटना
याबाबत भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास बोदवड-मलकापूर दरम्यान ट्रॅक मशीन रुळावरुन घसरली.
या गाड्यांना उशिर
तातडीने अॅक्सीडेंट रिलिफ ट्रेन तज्ज्ञ कर्मचारी वर्ग घटनास्थळी हजर झाले. पहाटे 6 वाजेच्या सुमारास रेल्वे रुळाखाली उतरलेली ट्रॅक मशीन रुळावरुन बाजुला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामुळे 12111 मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, 12809 हावडा मेल, 18029 शालीमार एक्स्प्रेस या गाड्यांना विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांना देखील काही वेळ त्रास सहन करावा लागला.