Jamner bribe taking junior engineer shackled at midnight भुसावळ : शेतजमिनीवर लघू उद्योग सुरू करण्यासाठी 25 केव्हीएची डीपी एनएससी मोफत योजनेंतर्गत मंजूर करून देण्यासाठी सहा लाखांची लाच मागणी करून ती स्वीकारताना ट्रॅप आल्याचा संशय येताच पहूरचे कनिष्ठ अभियंता हेमंत शालिग्राम पाटील (42, शिवाजी नगर, जामनेर) यांनी शुक्रवारी सकाळी धूम ठोकली होती. या प्रकरणी जामनेर पोलिसात रात्री आरोपी पसार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र मध्यरात्री आरोपी जामनेरातील निवासस्थानी आल्याची गोपनीय माहिती औरंगाबादच्या एसीबी पथकाला मिळताच पथकाने आरोपीला अटक केली. संशयीताला जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीला अधिक चौकशीकामी औरंगाबाद येथे नेण्यात आले आहे.
एसीबी पथकाला गुंगारा देत काढला होता पळ
29 वर्षीय तरुण तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांना लघू उद्योग सुरू करण्यासाठी वीज रोहित्राची (डीपी) आवश्यकता असल्याने त्यांनी कनिष्ठ अभियंता हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला होता मात्र पाटील यांनी 25 केव्हीएची डीपी एनएससी मोफत योजनेंतर्गत मंजूर करून देण्यासाठी सहा लाखांची लाच मागणी केली व लाच न दिल्यास हे काम कुणाकडूनही होवू देणार नाही, असे सांगितल्याने तक्रारदाराने लाच देण्याचे मान्य करीत औरंगाबाद एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. एसीबीने शुक्रवार, 5 रोजी सकाळी सापळा रचला मात्र एसीबीचा ट्रॅप आल्याचा संशय येताच आरोपी हेमंत पाटील याने चारचाकीतून पळ काढला होता. रात्री उशिरा या प्रकरणी जामनेर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हादेखील करण्यात आला.
आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी
संशयीत आरोपी हेमंत पाटील हा जामनेरातील घरी शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता आल्याची गोपनीय माहिती औरंगाबाद एसीबीच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने आरोपीला मध्यरात्रीच अटक केली. संशयीताला शनिवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयीताला अधिक तपासासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी व सहकारी करीत आहेत.