सिमला- रुकरी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ३५ विद्यार्थी हिमाचल प्रदेशात लाहौल आणि सिप्ती येथे ट्रेकिंगला गेले असतांना बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी असल्याने सध्या हवामान खराब आहे. विद्यार्थ्यांसहित ट्रेकिंगसाठी आलेले एकूण ४५ जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.
बेपत्ता झालेल्यांपैकी एक विद्यार्थी अंकित भाटी याच्या वडिलांचं म्हणणं आहे की, ‘हा ग्रुप ट्रेकसाठी हम्पटा येथे गेला होता आणि तेथून प्रसिद्ध पर्यटनस्थळ मनालीला परतणार होते. मात्र अद्याप ग्रुपमधील एकाही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही’.
हिमाचल प्रदेशातील अनेक ठिकाणी तुफान पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. कुल्लू, कांगरा आणि चम्बा जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.