ट्रॉन्सफार्मरमधील कॉपर कॉईलसह ऑईल लांबवणार्‍या टोळीतील म्होरक्या जाळ्यात

शिरपूर तालुक्यातील तांडे शिवारातील ट्रान्सफार्मरमधील कॉपर कॉईल व पॉवर आईल चोरीचा उलगडा

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील तांडे शिवारातील औद्योगिक परीसरात असलेल्या महाकॉट फायबर कंपनीची तीन लाख 28 हजार रुपये किंमतीची कॉपर वायर व पॉवर ऑईलची चोरीप्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार रवी उर्फ लालू देविलाल फुलेरी यास धुळे एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.

थाळनेर पोलिसात दाखल होता गुन्हा
चोरीची घटना 27 फेब्रुवारी 2022 रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी महाकट फायबर कंपनीचे मॅनेजर संतोष कौतीक पाटील यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा थाळनेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा हे समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना सदर मुद्देमालाची चोरी मध्यप्रदेशातील देवास येथील रवी उर्फ लालू देवीलाल फुलेरी याने व त्यांच्या गुन्हेगारी टोळीने केली असल्याची माहिती मिळाल्यावरून संशयित रवी उर्फ लालू देवीलाल फुलेरी यास 26 एप्रिल 2022 रोजी मध्यप्रदेशातील देवास येथून अटक केली होती. आरोपीने चार साथीदारांसह गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपीला थाळनेर पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय योगेश राऊत, रफिक पठाण, गौतम सपकाळे, राहुल सानप, प्रकाश सोनार, संदीप सरग, कमलेश सुर्यवंशी आदींच्या पथकाने उघडकीस आणला.

कॉपर वॉयर व कॉईल लांबवली
संशयितांनी तांडे शिवारात असलेल्या महाकॉट फायबर कंपनीच्या भिंतीला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधून 26 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 10 ते 27 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान 2 लाख 88 हजार रुपये किमतीची 960 किलो वजनाच्या कॉपर वायर असलेल्या 3 कॉईल व 40 हजार रुपये किंमतीचे 500 लिटर पॉवर ऑईल असे 3 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.