ट्रॉमा टीम प्रशिक्षण उत्तम

0

धुळे : महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला व बालकल्याण विभाग, धुळे यांनी राबविलेला मनोधैर्य योजनेंतर्गत ट्रॉमा टीम प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले. जिल्हा व महिला बालविकास विभाग, धुळे यांच्या वतीने आज कल्याण भवन, धुळे येथे ट्रॉमा टीम प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पोलीस अधीक्षक चैतन्या एस. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर.तडवी, यशदा, पुणे येथून प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले ॲड. गवारे, ॲड. पीयुष गडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत, जिल्हा परिविक्षा अधिकारी एम.एम.बागुल, जी.बी.वाल्डे, आदि उपस्थित होते.

आत्मविश्वास देण्याची गरज
यावेळी पांढरपट्टे म्हणाले, महिला व बालविकास विभागाचा अत्यंत चांगला उपक्रम आहे. मनोधैर्य प्रशिक्षण हा समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे. या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी त्यांना आधाराची गरज आहे. आजची स्त्री पुरुषांइतकीच समर्थ आहे. समाजामध्ये पिडीत अत्याचारित स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा असतो. अशा स्त्रियांना आधार, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास देण्याची गरज आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांनी संबंधितांना लाभ मिळवून द्यावा.

कायदा अत्यंत मजबूत
यावेळी पोलीस अधीक्षक चैतन्या एस. म्हणाले, हा कार्यक्रम महत्वाचा असून अत्याचारीत महिलांसाठी असलेला कायदा अत्यंत मजबूत केला आहे. पोलिसांकडे तक्रार आल्यास त्याची नोंद करणे महत्वाचे आहे. एक वर्षाच्या आत या केसचा निकाल लागणेसाठी दक्षता घेतली जाते. अशा घटनांचा तपास महिला अधिकारीकडे सोपविला जातो. या घटनेतील आरोपींना शिक्षा झाल्यास महिलांचे मनोधैर्य उंचावण्यास मदतच होणार आहे. पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी प्रशिक्षणाचा उपयोग घ्यावा आपल्या कार्यक्षेत्रात नक्कीच त्याचा उपयोग होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, यांनी केले तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी एम.एम.बागुल यांनी मानले.

स्वच्छता महारॅली कार्यक्रम
स्वच्छ सर्वेक्षणाची अंमलबजावणी आपल्या घरापासून, गल्लीपासून, गावापासून, शाळा आणि महाविद्यालयापासून सुरु होते असे उदगार जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संसथेत स्वच्छ सर्वेक्षण 2017 च्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता महारॅली कार्यक्रमात केले. केंद्र शासनामार्फत संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2017 ची व्यापक अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 27 डिसेंबरला सकाळी 7 वाजता स्वच्छता महारॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक, व प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली परिसराची स्वच्छता करीत नवरंग कॉलनी, लक्ष्मीनगर, गुलमोहर कॉलनी, गोंदूर रोड, शनीमंदीर, दत्त मंदीर मार्गे संस्थेत पोहचली. या रॅलीत मा.जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, महापालिका आयुक्त संगिता धायगुडे यांनी सक्रीय सहभाग घेतला. यावेळी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींना स्वच्छता शपथ संस्थेचे प्राचार्य एम.के.पाटी यांनी दिली. कार्यक्रमाचे आभर प्रदर्शन शिल्प निदेशक जी.ओ.परदेशी यांनी केले.