मत किंवा विचार मांडण्याचं प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडिया हा एक चांगला प्लॅटफॉर्म असला, तरी तो तितकाच घातकही असतो. एखाद्याची निंदानालस्ती करून प्रतिष्ठेची बदनामी करण्याचे काम सोशल मीडियावर सहज होत आहे. एखादी पोस्ट शेअर केली, मग ती पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह की, लगेच तुमच्या पोस्टपासून तुमच्या चारित्र्यावर, बुद्धीवर, प्रतिष्ठेवर आक्षेपार्ह ट्रोलर्सचा भडिमार सुरू होतो. आज जो तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. पण सोशल मीडियावर ट्रोल करणार्या नेटिझन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: महिलांना ट्रोल करणार्यांची संख्या सर्वाधिकच. महिलांच्या बोलण्यावर सडून टीका करत त्यांना सर्रास अपशब्दांचा वापर करत ट्रोल केल्याचे गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर दिसून आले. या ट्रोल करणार्या नेटिझनला काही महिलांनी त्यांच्या अंदाजात उत्तरं दिली, तर काहींनी इग्नॉर करणे जास्त योग्य मानले. महिलांबाबतीत कोणतेही तारतम्य न बाळगता सर्रास अश्लील व अपशब्दांचा वापर करत, शिवीगाळ करत नेटिझन आपला राग व्यक्त करतात. एकीकडे महिलांना मान-सन्मान द्यावा, त्यांचा आदर करावा अशी भाषा करायची आणि दुसरीकडे त्यांना अपशब्दाचा वापर करत शिवीगाळ करत त्यांच्यावर टीका करायची, हे कितपत योग्य आहे. नेटिझनने आपले मत मांडताना किंवा टीका करताना थोडेतरी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.
नुकतेच सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना अशाच ट्रोलच्या टीकेला सामोरे जावे लागले. लता मंगेशकर यांनी रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. आता शुभेच्छा देणे यात काय गैर आहे. पण त्यांच्या शुभेच्छा एका युझर्सला इतक्या खटकल्या की, त्याने चक्क लतादीदींना शिवी देत ट्रोल केले. समाजातील एका प्रतिष्ठित महिलेला जर अशा प्रकारे सोशल मीडियावर ट्रोल केले जात असेल, तर सोशल मीडिया किती घातक ठरतोय आणि अशा ट्रोलर्सची वेळीच दखल घेत त्यांना आळा घालणे किती गरजेचे आहे, याची कल्पना येऊ शकते. महिलांनी काहीही बोललं, काहीही केलं की लगेच त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं. आक्षेपार्ह, अश्लील भाषेत कोणीही ऊठसूट काहीही बोलतं, स्वतःच्या घरातल्या स्त्रियांचा आपण आदर करतो, मग इतर स्त्रियांबाबतीत बोलताना कशी काय यांची जीभ घसरते? आपल्या घरातल्या स्त्रीला कोणी शिवी दिलेली चालेल का? मग दुसर्या एका महिलाबाबतीत आपली मानमर्यादा कशी काय कमी होते?
एखादा विषय काय, एखाद्याचं मत काय, हे जाणून घेण्याच्या आधीच आपल्या विकृत विचारांचं प्रदर्शन मांडण्याची काही लोकांना फारच हौस असते. सोशल मीडियावर अशा विकृत बुद्धीच्या उठाठेव करणार्या लोकांची काही कमी नाही. एखादी महिला सेलिब्रिटी काहीही बोलली की तिला ट्रोल करा, काय खाल्ले तरी ट्रोल, तिने काय कपडे घातले आणि यांना पचले नाही की लागलीच तिच्यावरील संस्कार काढले जातात. अगदी अलीकडेच अभिनेत्री करीना कपूरने एका कार्यक्रमादरम्यान काळा ड्रेस घातला. तिचा तो लूक युझर्सना काहीसा भावला नाही तर त्यावर करीनाला फॅशनचे धडे गिरवण्यापासून ते तू एका मुलाची आई आहेस, तुला लाज वाटली पाहिजे, बाई ही साडीतच शोभून दिसते, अशा नाना तर्हेच्या कॉमेंट देऊन युझर्सनी पार तिची इज्जतच चव्हाट्यावर मांडली.
मत मांडण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. पण एखाद्या महिलेबाबतीत आक्षेपार्ह भाषेत बोलून पार तिची बदनामी करून स्वतःचे मत मांडण्याची ही कोणती पद्धत? बरं प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून अशा विकृतींकडे दुर्लक्ष केले, तरी ती अजूनच फोफावत जाते. म्हणजे ती महिला घाबरून, बदनामीमुळे काहीच बोलत नाही, असा समज करून त्या महिलेचा जीव मेटाकुटीला येईपर्यंत तिची निंदानालस्ती केली जाते, अशा उठाठेव करणार्या ट्रोलर्सना मात्र करीनाने तिच्याच अंदाजात चांगलंच उत्तर दिलं. देव अशा ट्रोलर्सना सद्बुद्धी देवो. महिला ही सेलिब्रिटी असो की लेखिका असो की एखादी गृहिणी असो तिला प्रत्येक वेळी अशा घटनांना सामोरे जावेच लागते. एका महिलेबद्दल वक्तव्य करताना किमान तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आजही महिलेला तिचा मान मिळताना दिसत नाही. तिचा अवमान केल्या जाते. आत हेच बघा ना. क्रिकेट मॅचमध्ये विराट कोहली आऊट झाला, तर लगेच अनुष्का शर्मा पणवती आहे, अनुष्काचा पायगुण चांगला नाही. ती विराटसाठी लकी नाही, तिला लाज वाटली पाहिजे, असं म्हणत त्या अनुष्कालाच ट्रोल केलं गेलं. बरं विराट खेळला. तो आऊट झाला. तो खराब खेळला, यात अनुष्काचा काय दोष? तो खेळ आहे. एखाद्या दिवशी नाही खेळला तो व्यवस्थित, पण या सर्वांचं खापर अनुष्कावर फोडत त्याच्या हरण्याला तिलाच कोसलं गेलं आणि मग सुरू झाला अनुष्कावर अश्लील आणि आक्षेपार्ह टीकेचा भडिमार.
मुळातच अशा अविचारी युझर्सना खत-पाणी न घालता, त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता याविरोधात वेळीच आवाज उठवणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर जर एखाद्या प्रतिष्ठित महिलेचा मान-सन्मान राखला जात नसेल तर सामान्य महिलेची काय अवस्था असेल, हे यावरून स्पष्ट होते. अशा अनेक सामान्य महिलांबरोबरच सेलिबे्रटी महिलांनाही तितकंच बळी पडावं लागतंय. मग ते ऐश्वर्या रायने एका कार्यक्रमात तिच्या मुलीला केलेला किस असो किंवा मग रविना टंडनच्या एखाद्या स्टेटमेंटपासून स्वरा भास्करच्या चित्रपटातील सीनचा वाद असो किंवा मग ईरा भास्कर यांनी वीरे दि वेडिंग चित्रपटावर दिलेली प्रतिक्रिया असो. सोशल मीडिया जितका फायद्याचा तितकाच तो घातकही ठरत आहे, अशा ट्रोलर्सवर वेळीच करवाई करत बंधणे घालणे गरजेचे आहे. ट्विंकल खन्नाने म्हटल्याप्रमाणे असे ट्रोल करणारे युझर्स हे झुरळ्याप्रमाणे असतात, यांचा वेळीच नायनाट करणे गरजेचे आहे. वेळीच दखल घेतली, तर हा व्हायरस पसरत नाही, हे अगदी खरे. प्रत्येकालाच बोलण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. मग ते स्त्री असो की पुरुष. पण या स्वातंत्र्यात कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये एवढेच.
नेटिझन्सना आवर घाला!
आज जो तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. पण सोशल मीडियावर ट्रोल करणार्या नेटिझन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: महिलांना ट्रोल करणार्यांची संख्या सर्वाधिकच. महिलांच्या बोलण्यावर टीका करत त्यांना सर्रास अपशब्दांचा वापर करत ट्रोल केल्याचे गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर दिसून आले. या ट्रोल करणार्या नेटिझनला काही महिलांनी त्यांच्या अंदाजात उत्तरं दिली तर काहींनी इग्नॉर करणे जास्त योग्य मानले. महिलांबाबतीत कोणतेही तारतम्य न बाळगता सर्रास अश्लील व अपशब्दांचा वापर करत, शिवीगाळ करत नेटिझन आपला राग व्यक्त करतात. एकीकडे महिलांना मान-सन्मान द्यावा, त्यांचा आदर करावा, अशी भाषा करायची आणि दुसरीकडे त्यांना अपशब्दाचा वापर करत शिवीगाळ करत त्यांच्यावर टीका करायची, हे कितपत योग्य आहे.
– अलिशा अ. पाटील
प्रतिनिधी, जनशक्ति
8268187940