ट्रोलर्स मला मामी म्हणतात मात्र मला मज्जा वाटते ! ; अमृता फडणवीसांनी दिले त्रिशंकू सरकारच्या ट्रोलर्सना धन्यवाद
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पातेलेभर तुपासोबत 35 पुरणपोळ्या खात होते, अशी आठवण झी वृत्तवाहिनीच्या ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी सांगितली होती मात्र नंतर त्यांच्या या वक्तव्याची सोशल मिडीयातून चांगली खिल्ली उडवण्यात आली मात्र आता एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘महा माझा कट्टा’ कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे सहभागी झाल्यानंतर त्यांना पुन्हा या विषयी छेडले असता अमृत फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्रजींच्या एका मित्राने लग्नातील किस्सा सांगताना, त्यांनी 30 ते 35 पुरणपोळ्या खाल्याचं सांगितलं होतं. तो मित्र अतिशय जवळचा होता, त्यावर विश्वास ठेऊन मी हे सांगितलं होतं, असे अमृता यांनी यावेळी स्पष्ट केले तर फडणवीसांनी, मला पुरणपोळी जास्त आवडत नसल्याचं स्पष्ट केलं.
फडणवीस स्पष्टच म्हणाले : मला पुरणपोळी आवडत नाही
अमृता यांनी देवेंद्र यांना पुरणपोळी आवडत असल्याचे विधान केल्यानंतर फडणवीस यांनी किस्सा सांगताना सांगितले की मी जिथं जाईल तिथं पुरणपोळीच दिली जाते. मला जेवणाच्या आमंत्रणातही पुरणपोळीच देण्यात येते. पण, मला खरंच पुरणपोळी नाही आवडत. मी फार तर एखादी पुरणपोळी खाऊ शकेल. मी सर्वांना विनंती करतो की, मला पुरणपोळी नका देत जाऊ. मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतात, बंगाली मिठाई आवडते, हे आवडीचे पदार्थ त्यांनी या कार्यक्रमात सांगितले.
मला मामी म्हटल्यावर मज्जाच वाटते
एबीपी माझाच्या महामाझा कट्टा कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस दोघेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ट्रोलर्सबाबत बेघडक मत मांडले. तसेच ट्रोलर्स मामी म्हणून ट्रोल करतात, त्याबाबत काय वाटते, असे विचारले असता अमृता फडणवीस यांनी मल्ला मज्जाच वाटते, असे सांगितले. यावेळी ट्रोलिंग करणार्या ट्रोलर्सचे आभार मानत अमृता फडणवीस यांनी त्यांना खोचक टोला लगावला. त्या म्हणाल्या, मी त्रिशंकू सरकारच्या ट्रोलर्सना नक्कीच धन्यवाद देईन कारण त्यांच्यामुळेच माझ्यातील स्त्री शक्तीचा जागर झाला आहे. मी असेच माझे विचार व्यक्त करत राहीन, तुम्ही मला असेच ट्रोल करत राहा, अशीही मी तुम्हाला विनंती करते, असा टोला त्यांनी लगावला.