ट्विटमुळे तरुणी देहविक्रीपासून बचावल्या

0

भुसावळ। पुणे येथे देहविक्रीच्या व्यवसायाला लावण्याच्या उद्देशाने सिक्कीम येथील अल्पवयीन तरुणींना रोजगार मिळवून देण्याच्या बहाण्याने फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ट्विटमुळे फसला. या तरुणी आझादहिंद एक्सप्रेसने जात असल्याची माहिती नातेवाईकांनी ट्विटरद्वारे रेल्वेमंत्र्यांना दिली. यावर प्रभू यांनी लागलीच अधिकार्‍यांना सुचना देऊन आरपीएफ कर्मचार्‍यांनी जळगाव स्थानकावर रेल्वेची तपासणी करुन या तीनही तरुणींना उतरवून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

रेल्वेमंत्र्यांना माहिती : सिक्कीम मधील रावंगला शहरातील गीता सुनार (वय 14), यमुना सुनार (वय 15) या तरुणींना अस्मिता थापा (वय 24) या तरुणीने पुणे येथे चांगल्या पगारावर नोकरीस लावून देण्याचे सांगितल्याने या दोन्ही बहिणी घरात कुणालाही काही न सांगता 15 रोजी आझाद हिंद एक्सप्रेसने पुण्याकडे रवाना झाल्या. याची माहिती मुलींच्या पालकांना लागली असता त्यांनी लागलीच ट्विटरवरुन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना याबाबत माहिती दिली असता रेल्वे मंत्र्यांनी यंत्रणा फिरवून गाडीचे लोकेशन तपासले असता गाडी भुसावळ स्थानकाजवळ असताना भुसावळ आरपीएफ विभागास याची माहिती देण्यात आली.

मुली पालकांच्या स्वाधीन
रेल्वे सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ निरीक्षक व्हि.के. लांजीवार यांनी याबाबत जळगाव स्थानकावर सुचित केल्यामुळे येथे गाडीची तपासणी करण्यात येऊन तरुणींना खाली उतरविण्यात गआले. त्यांना भुसावळ येथे चाईल्ड वेल्थ सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. दरम्यान यातील आस्मिता थापा हिची चौकशी केली असता ती पुण्यात देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची कबुली दिली.