बंगळूरू: भारतीय संघाचा युवा सलामीवीर केएल राहुल सोशल मीडियावर सक्रिय असला तरी तो चाहत्यांच्या प्रतिक्रियांवर सहसा व्यक्त होत नाही. पण यावेळी पहिल्यांदाच केएल राहुलने आपल्यावर टीका करणाऱ्या एका ट्विटरकराचे तोंड बंद केले. भारतीय संघाचा फिरकीपटू आर.अश्विन याने केएल राहुलचे ट्विटर हॅण्डल फॉलो केले. क्रिकेटचा महानायक आर.अश्विन आपल्याला फॉलो करतोय यापेक्षा दिवसाची चांगली सुरूवात काय असू शकते, अशा आशयाचे ट्विट केएल राहुलने केले. यावर प्रतिक्रिया देताना एका ट्विटरकराने केएल राहुलला त्याच्या निराशाजनक कामगिरीवरून लक्ष्य केले.
तूच ये आणि आम्हाला धडे दे !
‘ते सर्व राहू दे बाजूला..धावा कशा करायच्या यावर लक्ष केंद्रीत कर’, असा खोचक टोला बिईंग चिराग दवे या ट्विटर हॅण्डलवरून लगावण्यात आला. मग केएल राहुलनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले. “प्लीज मित्रा, तूच ये आणि धडे दे आम्हाला. धावा कशा करायच्या याचे गमक तुला नक्कीच ठावूक असेल”, असे ट्विट केएल राहुलने केले. त्याच्या या प्रत्युत्तरावर चाहत्यांनीही पाठिंबा दिला. केएल राहुल देखील टीकाकारांना तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकतो, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर क्रिकेटपटू देखील आपल्यासारखेच सामान्य माणसंच असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात याची जाणीव आपण ठेवायला हवी, असे म्हणत आणखी एका चाहत्याने केएल राहुलला पाठिंबा दिला.