जळगाव – दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा संदेश ट्विटरवरून व्हायरल करणार्या विनायक अशोक कोळी उर्फ विक्की कोळी ( रा. प्लॉट नं २९, सत्यम पार्क , दूध फेडरेशन परिसर या तरुणाविरुद्ध रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण निकम यांना विक्की कोळी या तरुणाने त्याच्या ट्विटर अकाउंट वरुन धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्याची माहिती दिली. अरुण निकम यांनी घटनेची गंभीर दखल घेत तरुणाच्या शोधार्थ तत्काळ पोलीस नाईक मनोज पाटील, गणेश पाटील या कर्मचाऱ्यांना रवाना केले कर्मचाऱ्यांनी विक्री यास रविवारी त्याच्या घरून ताब्यात घेतले. त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजुन २१ मिनिटांनी त्याने ट्विटरवरून धार्मिक तेढ निर्माण करणार्या संदेशाची पोस्ट टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्या विरोधात मनोज पाटील या कर्मचार्याच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशाने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सायबर विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. त्यानुसार ट्विटर संबंधित पहिलाच गुन्हा जळगाव शहरात दाखल झाला आहे .