ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या आक्रमणामुळे गोलंदाजांवरील दडपण वाढले

0

मुंबई । ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या आक्रमणामुळे गोलंदाजांवरील दडपण वाढले असल्याची चिंता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केली आहे. युवा गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करता येण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या ‘बोलिंग मास्टर’ उत्पादनाचे अनावरण ली याच्या हस्ते मुंबईत झाले, त्या वेळी तो बोलत होता. या कार्यक्रमाला भारताच्या सचिन तेंडुलकरसह व्हीव्हीएस लक्ष्मण, जसप्रीत बुमराह तसेच ऑस्ट्रेलियाचे मिचेल जॉन्सन, डेव्हिड वॉर्नर, जेसन क्रेझा हे खेळाडूही उपस्थित होते.

यार्करचे कौशल्य घटले: यावेळी बोलताना तो म्हणाला की, बॅटची लांबी वाढत चालली आहे, मात्र गोलंदाजाने उसळत्या टप्प्याचे चेंडू किती टाकायचे यावर मर्यादा आहेत. फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यासाठी यॉर्कर हे प्रभावी अस्त्र आहे. मात्र युवा गोलंदाजांचे यॉर्कर टाकण्याचे कौशल्यच घटले आहे, अशी खंत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने प्रकट केली आहे. “ट्वेन्टी-20 प्रकारात फलंदाज प्रत्येक चेंडूवर चौकार, षटकार लगावण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना रोखण्यासाठी चोख अभ्यास आणि सराव आवश्यक आहे. घोटीव यॉर्कर टाकता येण्यासाठी सरावसत्रात अथक मेहनत करावी लागते. भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह भेदक यॉर्कर टाकतो. त्यामुळे हाणामारीच्या षटकांत धावा रोखण्यासाठी तो उपयुक्त ठरतो.

उमेशचे केले कौतुक
ली याने यावेळी उमेश यादवच्या गोलंदाजीचे विशेष कौतुक केले. उमेश यादवने उसळत्या चेंडूचा खुबीने वापर करत अव्वल फलंदाजांना सतावले आहे. धिम्या गतीचा उसळता चेंडू लुप्त झाला आहे. गोलंदाजांनी चतुराईने गोलंदाजी केल्यास ट्वेन्टी-20 प्रकारातही वर्चस्व गाजवता येते. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने जेतेपदाची कमाई केली होती. हैदराबादच्या विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली होती,”
असे ली याने सांगितले.

खेळाडूंच्या दुखापती वाढल्या
“कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 तसेच विविध देशांत होणार्‍या ट्वेन्टी-20 लीग स्पर्धा यामुळे आंतराष्ट्रीय वेळापत्रक भरगच्च असते. सध्या खेळाडूंच्या वाढत्या दुखापतीच्या समस्येवर देखील त्याने आपले मत व्यक्त केले. तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण प्रदर्शन करता यावे, यासाठी दुखापतीचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. दुखापतीमुळे महत्वाच्या स्पर्धांना खेळाडूंना मुकावे लागत असल्याची खंत देखील त्याने व्यक्त केली. एका प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अन्य प्रकारांतून निवृत्ती स्वीकारण्याचा कल वाढतो आहे,” याकडेही ली याने लक्ष वेधले.