ठकारवाडीत महिलांच्या चेहर्‍यावर फुलला आनंद

0

मुंबई माता बाल संगोपन संस्था व थेमिस मेडिकेअर यांनी मिटवली पाण्याची वणवण

राजगुरुनगर  : कमान येथील (ता. खेड) ठाकरवाडीतील नागरिकांचा गेली 50 हून अधिक वर्षापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न राजगुरुनगर येथील मुंबई माता बाल संगोपन संस्था व थेमिस मेडिकेअर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सोडविण्यात आला आहे. ठाकरवाडीत दोन जलकुंभ आणि जलवाहिनी करून हा प्रश्‍न मार्गी लागल्याने ठाकरवाडीतील महिलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसू लागला आहे. वर्षानुवर्षे डोक्यावरील दीड दोन किलोमीटरचा पाण्याचा हंडा उतरला आहे.ठाकरवाडीत उभारलेल्या जलकुंभ आणि जलवाहिनीचे उद्घाटन मुंबई माता बाल संगोपन केंद्रात सचिव डॉ. माधव साठे यांच्या हस्ते झाले. डॉ. शैलजा तेलंग, समन्वयक शर्मिला सांडभोर, स्वाती शिंदे, संध्या पंडितराव, नीता करंदीकर, अरुण करंदीकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम सपाट, अशोक मांजरे, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नाईकरे यांच्यासह शाळेचे शिक्षक, ठाकरवाडीचे ग्रामस्थ, विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

येथील प्राथमिक शाळा राजगुरुनगर येथील मुंबई माता बाल संगोपन केंद्रात दत्तक घेतली आहे. मागासलेल्या ठाकर समाजातील मुलांना शाळेत अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले ते यशस्वी झाल्यानंतर संस्थेच्या वतीने आता ग्रामस्थांच्या प्रश्‍नांकडे विशेषतः महिलांच्या आरोग्याकडे आणि त्याच्या मूलभूत प्रश्‍नांकडे लक्ष दिले जात आहे.

दोन जलकुंभ आणि जलवाहिन्यांची सोय
सुमारे 50 वर्षापासूनचा येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा प्रयत्न मुंबई माता बाल संगोपन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. येथील महिलांची अडचण जाणून घेऊन संस्थेने आर्थिक मदत करून दोन जलकुंभ आणि जलवाहिनीची सोय व टाक्या मुंबई मत बाल संगोपन केंद्राने बांधून दिल्या आहेत. त्यामधून 4 वस्त्यांना जलवाहिनी टाकून पिण्याचे पाणी पुरविण्यात आले आहे. कमान ग्रामस्थ व ठाकरवाडीमधील ग्रामस्थांनी श्रमदानाने 1 किमी लांबीची नळ जोडणी केली आहे.

यावेळी डॉ. माधव साठे यांनी गावातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. पाण्याची साठवण, पाणी बचत, उन्हाळ्यात पाण्याची बचत याबाबत ग्रामस्थांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विनोद चन्नोळे यांनी केले तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम सपाट यांनी आभार मानले.