भाजप पक्षश्रेष्ठी, अधिकार्यांची डोकेदुखी वाढली : कंत्राट, टक्केवारीसाठी महापालिकेत थयथयाट
पिंपरी-चिंचवड : महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता मिळताच ’कधी नाही मिळालं आणि गटकन गिळालं’ अशा पद्धतीने भाजपच्या काही पदाधिकार्यांचा कारभार सुरू आहे. सगळी कंत्राटे आपल्याच खिशात घालण्यासाठी एका पदाधिकार्याने महापालिकेत सत्ताबाह्य केंद्र तयार केले आहे. त्यामुळे अधिकार्यांसह भाजप नेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. या ’ठग’ पदाधिकार्याचे उपद्रवमूल्य वाढतच चालल्याने भाजपच्या पारदर्शक कारभाराचे धिंदवडे निघाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एककल्ली कारभार, विरोधकांकडून सातत्याने होणारे भ्रष्टाचाराचे आरोप याला कंटाळलेल्या पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिकेची सुत्रे भाजपच्या हाती सोपविली.
आमदारांच्या निर्णयांना मोडता
वास्तविक राष्ट्रवादीचेच बहुसंख्य शिलेदार भाजपमध्ये गेले असताना महापालिकेच्या कारभाराचे चित्र बदलेल, अशी अपेक्षा शहरवासियांना होती. आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे हे खर्या अर्थाने या सत्ता बदलाचे शिल्पकार ठरले. मात्र, भाजपचे काही तथाकथित निष्ठावान आमदार द्वयींच्या चांगल्या निर्णयांना ’मोडता’ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर ’’आम्हाला काही तरी द्या नाही तर पक्षश्रेष्ठींशी बोलावे लागेल’’, अशा शब्दात थेट ’ब्लॅकमेल’ करत आहेत. त्यापैकीच एक असलेला हा पदाधिकारी नव्याच नव्हे तर जुन्यांसाठीही आता डोकेदुखी ठरु लागला आहे.
माहिती अधिकारातून ब्लॅकमेलिंग
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात माहिती अधिकारात माहिती मागवून ’ब्लॅकमेलिंग’ करण्याच्या या पदाधिकार्याच्या अनेक सुरस कथा आहेत. संघाचा हाडाचा स्वयंसेवक म्हणविणारा हा पदाधिकारी आमदारांसमोर ’दादा’, ’भाऊ’ म्हणतो. पाठीमागे आमदार द्वयींच्या ’उपरेपणा’विरोधात निष्ठावंतांमध्ये रान उठवतो. त्याच्या या ’उद्योगां’ची माहिती असल्यामुळेच तसेच त्याने वारंवार अकांडतांडव केल्याने अखेर महाापालिकेशी संबंधित पदाचा एक तुकडा फेकून त्याचे तोंड बंद करण्यात आले. त्यामुळे त्याचे उपद्रवमूल्य कमी होईल, अशी भाजप धुरीणांची आशा फोल ठरली आहे. ’भाऊं’च्या नावाखाली या पदाधिकार्याने अधिकार्यांना वेठीस धरण्याचे काम सुरु केले आहे.
’होर्डींग’च्या कंत्राटातून डल्ला
संगणक खरेदीपासून ते औषध खरेदीपर्यंतच्या निविदा प्रक्रियेत याची लुडबूड वादग्रस्त ठरली. शहरातील अनधिकृत होर्डींग हटविण्याचे कंत्राटही या पदाधिकार्याने मागील दाराने पदरात पाडून घेतले. विशेष म्हणजे एक कोटीची मूळ निविदा मंजूर केली असताना त्यात दीड कोटीची वाढ करुन महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे. महापालिकेतील कोणत्याही पदाधिकार्याला विश्वासात न घेता त्याने होर्डींग व्यावसायिकाची बैठक घेत दमबाजी केल्याची खमंग चर्चा आहे. या पदाधिकार्याचे उपद्रवमूल्य इतके वाढले आहे की, हा दिवसभर महापालिकेत ठाण मांडून असतो. निविदा मंजुरी प्रक्रियेत नको तितका हस्तक्षेप करत असल्याने पारदर्शक व इ-निविदा प्रक्रिया नावालाच उरली आहे. या सर्व प्रकारामुळे सांगताही येईना आणि सहनही होईना, अशी अवस्था महापालिका अधिकार्यांची झाली आहे.
समांतर सत्ता केंद्र
स्थायी समितीच्या अँटी चेंबरला बसून तो समांतर सत्ता केंद्र चालवू पाहत आहे. राष्ट्रवादीच्या काळातील ठेकेदार हटवून ’स्लिपींग पार्टनरशिप’ करत त्याने स्वतःच खिशात अनेक कंत्राटे घातली आहेत. ’आधीच मर्कट त्यात…’ अशी अवस्था या पदाधिकार्याची झाल्याने भाजप शहराध्यक्षांची चांगलीच गोची झाली आहे. स्वपक्षीय पदाधिकार्यांविरोधात शहराध्यक्षांचे कान भरुन सल्लागाराच्या भूमिकेत वावरणार्या हा पदाधिकारी त्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता. मात्र, खर्या अर्थाने शहराध्यक्षांसाठी झटणार्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता अंग काढून घेतले आहे. सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या सुरुवातीच्या काळात या पदाधिकार्यांनी काही स्वपक्षीय पदाधिकार्यांची ’सुपारी’ घेतली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत स्वतःची पोळी भाजून घेतली. या प्रकारामुळे सत्तेला एक वर्ष पुर्ण होत नाही तोच भाजपची पारदर्शक प्रतिमा मलीन झाली. या पदाधिकार्याच्या वाढत्या मर्कट लिलांचा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शहराध्यक्षांना मोठी किंमत चुकवावी लागण्याची भीती त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त होत आहे.
हस्तक असल्याचा अर्विभाव
भाजप पदाधिकारी, महापालिका अधिकार्यांपासून ते पत्रकारांपर्यंत प्रत्येकाला या पदाधिकार्याच्या अरेरावीचा सामना करावा लागत आहे. ’भाऊं’चा ’हस्तक’ असल्याच्या अर्विभावातील त्याच्या वावर वाढल्याने भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या जवळचे अनेकजण दुखावले गेले आहेत. ’बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ब्रीद आहे. यापूर्वीही सत्तेतील काही पदाधिकार्यांनी सत्तेच्या धुंदीचे दर्शन घडविले होते. मात्र, हे दर्शन फार काळ टिकले नाही. काळाच्या ओघात हे पदाधिकारी असे काही तोंडावर आपटले की अजूनही सावरु शकले नाहीत. त्यामुळे या पदाधिकार्याला वेळीच वेसण घालणे गरजेचे असल्याची अपेक्षा जगतापांचे काही समर्थक व्यक्त करत आहेत.