मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून निवडून आलेले 18 खासदारांना घेऊन प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा दौरा करणार आहेत. 16 जून रोजी हा दौरा आहे. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही राहणार आहेत. सहा महिन्यांपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा उचलत उद्धव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले होते.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत. ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, त्यास शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे म्हटले होते. तसेच राम मंदिर बांधण्याची तारीख आम्हाला हवी आहे, आम्हाला राम मंदिराच्या उभारणीची तारीख कळवा, नंतरच इतर विषयांवर बोलू, असे म्हणत उद्धव यांनी युतीचा मुद्दाही लांबणीवर ढकलला होता.