मुंबई: महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करणार अशी घोषणा शिवसेनेने यापूर्वी केली होती. दरम्यान आज महाविकास आघाडी सरकारला स्थापन होऊन शंभर दिवस पूर्ण झाले असून उद्या 7 रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, संजय राऊत दौऱ्याला जाणार आहेत. सर्व पक्षीय नेत्यांनी देखील या दौऱ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही खासदार राऊत यांनी केली. जवळपास २ हजार लोक अयोध्येला जाणार आहेत.
उद्या ४.३० वाजता अयोध्येला रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. देशात कोरोनाचे संकट असल्याने मुख्यमंत्री शरयू नदीवर आरती करणार नाही अशी माहिती यावेळी खासदार संजय राऊत यांनी दिली.
कॉंग्रेस या दौऱ्याला विरोध करणार नाही कारण महात्मा गांधी यांनी सुद्धा रामराज्याचे स्वप्न बघितले आहे. राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी हिंदूंच्या मंदिरात जाऊन पूजा केली आहे. त्यामुळे त्यांचा विरोध असण्याचे कारण नाही असेही खासदार राऊत यांनी सांगितले.