ठाकरी शैली ती हिच का?

0

शिवाजी महाराजांचा जो इतिहास राज ठाकरे यांचे सांस्कृतिक गुरू बाबासाहेब पुरंदरे सांगतात किंवा लिहून ठेवला आहे तो प्रबोधनकारांच्या विचारांना सरळ छेद देणारा आहे. माणसाचे दैवतीकरण त्याच्या कर्तृत्वाला तिलांजली देऊन कर्मकांडाची बजबजपुरी माजवतो असे प्रबोधनकारांना वाटत होते ते आजही शंभर टक्के सत्य ठरले आहे, अशावेळी राज ठाकरे नवनिर्माणाच्या नावाखाली नव्या पिढीसमोर काय वाढायला निघाले आहेत याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

सध्या महाराष्ट्राला बाळासाहेबानंतर जेवढे उद्धव, राज आणि आदित्य ठाकरे माहीत आहेत तेवढे कदाचित प्रबोधनकार ठाकरे म्हणजे केशव सीताराम ठाकरे माहीत नसावेत. आणखी काही वर्षांनंतर .. कोण हे प्रबोधनकार ठाकरे? असा प्रश्‍न नव्या पिढीने विचारला तर नवल वाटू नये. आजही अनेकांना प्रबोधनकार कोण होते हे माहीत नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात दोष माहीत नसणार्‍यांचा नाही, ज्यांना माहीत आहे अशांनी तरी काय दिवे लावले? ज्या मूठभर लोकांना ते माहीत आहेत त्यांनी आयुष्यात किती जणांना त्यांचा परिचय करून दिला? किंवा जे त्यांचे रक्ताचे वारसदार आहेत त्यांच्याकडून तरी वैचारिक वारसा, वसा सांगितला तरी जातो का? हे खरे प्रश्‍न आहेत, तर हे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पिताजी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे आजोबा आणि युवराज आदित्य ठाकरे यांचे पणजोबा. बाळासाहेब ठाकरे जिवंत असेपर्यंत अनेकदा प्रबोधनकारांचा उल्लेख कधीमधी त्यांच्या भाषणातून व्हायचा, भाषाशैली, शब्दातला अंगार आणि भिडण्याची तयारी ही वडिलांची देणगी असल्याचे बाळासाहेबांनी अनेकदा स्पष्ट केल्याचे अनेकांना आठवत असेल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि मुंबईच्या रस्त्यांवर ज्यांची सत्ता चालते असे तरुणांचे प्रौढ नेते राज ठाकरे यांनी नवा पक्ष स्थापन केल्यावर सुरुवातीच्या काळात बरेचदा प्रबोधनकारांचे नाव घेतले, काही सभांमध्ये तर त्यांच्या पुतळ्याला हारार्पणसुद्धा झाल्याचे आठवते. त्या तुलनेत उद्धव ठाकरे आजोबांचा फारसा उल्लेख करीत नाहीत. खुद्द बाळासाहेब ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले होते की, आजच्या माझ्या राजकारणाला प्रबोधनकार परवडणारे नाहीत, ते शंभर टक्के परखड सामाजिक होते, तर मी तेवढाच राजकारणी आहे. तरीही.. मंदिरात नुसता घंटा बडवत बसणारा हिंदू मला नकोय! यांसारखी जहाल वक्तव्य बाळासाहेबांनी केली आहेत हा त्यांच्यावरील प्रबोधनकारांचा वैचारिक प्रभाव सांगून जातो. राज ठाकरे मात्र तो प्रबोधनी वारसा सांगतही नाहीत आणि आजोबांना अपेक्षित काही करताना दिसतही नाहीत. उलट या ठाकरी वारशाचे वैचारिक चक्र उलटे कसे फिरवता येईल या प्रयत्नात ते दिसतात.

राज यांच्या या प्रयत्नाचा परिचय नुकताच नाशिकला झाला. महापालिकेच्या बळावर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने वस्तू संग्रहालय शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सुरू केले आहे. पुरंदरे यांनी आपल्याकडील दुर्मीळ शिवकालीन वस्तू तिथे ठेवल्या आहेत. आता पुरंदरे यांच्याकडे या वस्तू कशा आल्या हा प्रश्‍न इथे गैरलागू होतो. काही लोक पुरंदर्‍यांनी या वस्तू अभ्यासाच्या नावावर गोळा करून ढापल्या असल्याची गुस्ताखी करीत आहेत हा भाग वेगळा. याच संग्रहालयात शिवाजी महाराज पाठी भाता, हाती धनुष्य आणि आशीर्वाद देणार्‍या देवाच्या रूपात दाखवले आहेत असे चित्र लावण्यात आले आहे, विशेष म्हणजे त्यापुढे उभे राहूनच राज यांनी माध्यमांना माहिती दिल्याचे सर्वत्र प्रकाशित झाले आहे. हे महाराजांचे चित्र त्यांनाही खटकले नाही कारण ते पुरंदरेंच्या अनमोल खजानातील आहे आणि पुरंदरे स्वतः जरी केवळ शाहीर असल्याचे सांगत असले, तरी राजना तेच अस्सल इतिहासकार वाटतात आणि यात कुणी शंका व्यक्त केली तर त्याला पक्षात दिवसा तारे मोजायला पाठवले जाते.

राज ठाकरे यांची एक कार्यपद्धती आहे तशीच विचार पद्धतीसुद्धा आहे असा अनुभव गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र घेत आहे. ते एका बाजूला स्वतःला शिवप्रेमी म्हणवून घेतात आणि शिवद्रोही लोकांना डोक्यावर घेतात. मराठीचा कट्टर अभिमान असल्याचे सांगतात आणि मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात, देशाचे संविधान मान्य असल्याचे दाखवून परप्रांतीयांना टार्गेट करून त्याचे उल्लंंघन करतात, स्वतःचे मूळ मध्य प्रदेशातील असतानासुद्धा मराठी भाषा, मराठी अस्मिता यांचा जप करतात, खर्चाचे कारण पुढे करून शिवस्मारकाला विरोध करताना कुंभमेळा आणि गुरुतागद्दीला दिलेला निधी त्यांना दिसत नाही. विरोधाभासाने भरलेले राज ठाकरे शोधतो म्हणाल तर एखादा ग्रंथ तयार होऊ शकेल. इतिहासाला काव्य समजून कल्पनेच्या भरार्‍या मारणारे पुरंदरे जेवढे सांगतील त्या पलीकडे राज जायला तयार नसतात असे काही वर्षांत लक्षात आले आहे. परवाचे संभाजी महाराजांवरील त्यांचे वक्तव्य त्याचेच प्रतीक आहे. शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करण्याचा प्रयत्न अनेक वर्षे होतोय, राज ठाकरे त्या प्रयत्नाला सहकार्य करणारे ठरले आहेत.

शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष देव मानणारा मोठा वर्ग आहे हे जरी खरे असले, तरी एखाद्या हाडामासाच्या व्यक्तीला देव मानणे म्हणजे तिच्या कर्तृत्वाला नाकारणे होय, याचा आपल्याला विसर पडतोय हे लक्षात घ्यायला हवे. शिवाजी महाराजांना चार हात असल्याचे चित्र काढणारे श्रीकांत प्रधान यांना राज ठाकरे यांनी केलेली मदत अजून महाराष्ट्र विसरला नाही, जेम्स लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकर यांच्या तोंडाला काळे फासल्यावर राज साहेबांना भयंकर दुःख होते शेवटी पुण्यात जाऊन ते बहुलकारांची माफी मागतात आणि चुकीचा इतिहास देशावर लादणारे बाबासाहेब पुरंदरे त्यांना जीव की प्राण वाटत असतात एवढे कमी पडले की काय ते मराठा आरक्षणालासुद्धा विरोध करण्यात आपली शक्ती खर्च करताना दिसतात आणि वरून महाराष्ट्र आपल्या ताब्यात लोक का देत नाहीत याची त्यांना भयंकर चीडही येते. हे सगळे सामान्य माणसाच्या आकलनाला परवडणारे दिसत नाही आणि जे परवडत नसते त्याकडे लोक फिरकत नाहीत अशी रीत आहे.

शिवाजी महाराजांचा जो इतिहास राज ठाकरे यांचे सांस्कृतिक गुरू बाबासाहेब पुरंदरे सांगतात किंवा लिहून ठेवला आहे तो प्रबोधनकारांच्या विचारांना सरळ छेद देणारा आहे. माणसाचे दैवतीकरण त्याच्या कर्तृत्वाला तिलांजली देऊन कर्मकांडाची बजबजपुरी माजवतो, असे प्रबोधनकारांना वाटत होते ते आजही शंभर टक्के सत्य ठरले आहे अशावेळी राज ठाकरे नवनिर्माणाच्या नावाखाली नव्या पिढीसमोर काय वाढायला निघाले आहेत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीला प्रसंगी क पदार्थ समजून तिचे संकेत पायदळी तुडवण्यात राज साहेबांना आनंद होत असेल, तर लोक अपेक्षेपेक्षा खूप समजदार आहेत. नाशिक, पुणे मुंबई महापालिकेत काय झाले याची मोजदाद राजकीय निरीक्षकांच्या चार पावले पुढे जाऊन लोक ठेवायला लागले आहेत. राज ठाकरे निवडणुकांच्या काळातच कसे सक्रिय होतात इतरवेळी राज्यातल्या समस्यांनी त्यांच्या आतड्यावर पीळ पडत नसेल काय? असले फालतू प्रश्‍न कुणी विचारू नये, अशी त्यांच्याभोवती तटबंदी झाली आहे, कदाचित यालाच ठाकरी बाणा म्हणत असावेत.

– पुरुषोत्तम आवारे पाटील