पुणे । पालिकेत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र बसविण्याच्या महापालिकेने दिलेल्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देण्यात येईल. लवकर हे तैलचित्र बसविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील अधिकार्यांना दिले. अशी माहिती शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली. त्याचबरोबर पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबत सरकार लवकरच जनतेला हितकारक आणि सुयोग्य निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे
त्यांनी सांगितले.
आ. डॉ. नीलम गोर्हे यांनी गुरुवारी पालिकेचे शिवसेना गटनेते संजय भोसले, अशोक हरणावळ आणि विजय देशमुख यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पुणे, पिंपरी चिंचवड सोबतच राज्यातील इतरही शहरांतील अनेक वर्षे जुन्या भाजी मंडईचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार डॉ. गोर्हे यांनी मुख्यमंत्र्यांना सूचित केले.
त्याचबरोबर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील शहराचा वाढता विकास लक्षात घेता झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या नियमावलीमध्ये आणखी सुधारणा करणे अत्यावश्यक असल्याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. पुणे शहरात महापालिकेने तयार केलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनास भेट देण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.