नवी मुंबई – दिवंगत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. सिनेमा पाहण्यासाठी सिनेरसिकांनी पहाटेच सिनेमागृहांमध्ये मोठी गर्दी केली आहे. पण ‘ठाकरे’चित्रपटावरून वाद सुरूच आहे. आज वाशी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ सिनेमाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांनी येथे घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत सिनेमाचे पोस्टर लावले जात नाही तोपर्यंत थिएटरमध्ये ठिय्या मांडून बसणार, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता.
वाशीच्या आयनॉक्समध्ये सकाळी ८ वाजता ‘ठाकरे’सिनेमाचा ‘शो’ होता. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचले. पण, थिएटरबाहेर ‘ठाकरे’चे एकही पोस्टर न दिसल्याने शिवसैनिक संतापले आणि त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.