ठाकरे पिता-पुत्रांसह सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली: प्रतिज्ञापत्राची होणार फेरतपासणी

0

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला प्रतिज्ञापत्र फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. ठाकरे पिता-पुत्र आणि सुप्रिया सुळे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात काही गोष्टी लपविल्याचे आरोप करण्यात आले असून या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन फेरपडणताळणीची मागणी करण्यात आली आहे. ठाकरे पिता-पुत्र व सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातील ताळेबंदाची फेरपडताळणी करावी, असे कर मंडळाने म्हटले आहे.

खोट्या प्रतिज्ञापत्रांच्या बाबतीत निवडणूक आयोगाने आपली भूमिका अलीकडेच बदलली आहे. यापूर्वी तक्रारकर्त्यांना थेट न्यायालयात जाण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून दिले जात होते. मात्र निवडणूक आयोगाने भूमिका बदलली. त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी, संपत्तीचं विवरण, शैक्षणिक पात्रता या संबंधी खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यायचे आयोगाने ठरवले आहे.

एखाद्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास सध्याच्या कायद्यानुसार सहा महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.