ठाकरे व राणे एका तपानंतर एकत्र

0

सिंधुदूर्ग । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे तब्बल 12 वर्षांनी एकाच मंचावर आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे त्यांनी उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गडकरींवर स्तुतीसुमने
आजच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. नारायण राणे यांनी गडकरी यांच्या स्वागतासाठी शहरात शेकडो फलक लावले होते. तर भाषणातूनही त्यांनी गडकरींवर स्तुतीसुमने उधळली. जिथे विकास आहे, तिथे पक्षीय राजकारण करु नये’, असं यावेळी नारायण राणे बोलले आहेत. यावेळी नारायण राणेंनी नितीन गडकरींचा विकासपुरुष म्हणून उल्लेख केला. यामुळे राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंसंबंधी बोलताना आपण टीका करताना कधीही त्यांचा एकेरी उल्लेख केला नाही, असं नारायण राणेंनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनीदेखील भाषणात बोलताना नारायण राणेंचा उल्लेख करत नारायणराव राणे माझे पूर्वीचे सहकारी असल्याचं सांगितलं. नारायण राणे आणि मातोश्रीत आधी कटुतेचे वातावरण असतांना या कार्यक्रमातील वातावरण पाहता यात बर्‍याच प्रमाणात बदल झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. अर्थात राणे हे काँग्रेसपासून दूर होत असल्याचे संकेतही यातून मिळाले आहेत.