ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत: राहुल गांधींचे खळबळजनक वक्तव्य

0

नवी दिल्ली: गेल्या दोन तीन दिवसांपासून राजभवनावर राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा दिशेने हालचाल सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यानंतर या चर्चेला अधिकच उधाण आले. त्यातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आलबेल आहे की नाही हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्यातच आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठे खळबळजनक वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे मात्र काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकारणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत मत वक्त केले. दरम्यान त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असून सरकारला पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले आहे. आजच सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असल्याचे सांगत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता फेटाळून लावली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत योग्य समन्वय असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.