ठाणे । ठाणे शहरात संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ठाण्यातील गावदेवी मैदान येथे 1 मे पासून आंबा महोत्सवाला सुरूवात होत आहे. ठाण्यातील आंबा महोत्सवाचे हे 13 वे वर्ष आहे असल्याची माहिती संस्कारचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत हा महोत्सव 10 मेपर्यंत सुरू राहणार आहे. 1 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कोकणातील बागायतदारांचे सेंद्रीय पद्धतीचे आंबे या महोत्सवात नागरिकांना चाखायला मिळणार आहेत. आंबे व आंब्यांच्या इतर पदार्थांचे 55 स्टॉल्स या महोत्सवात मांडण्यात येणार आहे. यात कृषी विद्यापीठाचा वेगळा स्टॉल देखील असणार आहे. कोकणतील आंबा उत्पादक शेतकरी वेळोवेळी अडचणीत असतो. परंतु, हा शेतकरी सर्व संकटावर मात करुन आंब्याची शेती करतो, या वर्षी 40 टक्के आंब्याचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती आ. केळकर यांनी दिली.
दरम्यान, या आंबा महोत्सवाला 2 व 3 मे रोजी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि निमिर्ती सावंत भेट देणार आहेत. कोकणातील 1 लाख 80 हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड होते. 2015 साली 3 लाख 20 हजार मेट्रीक टन, 2016 साली 2 लाख 56 हजार मेट्रीक टन तर 2017 साली 1 लाख 28 हजार मेट्रिक टन आंब्याचे उत्पन्न झाले, अशी खंत आ. केळकर यांनी व्यक्त केली. तसेच आंबा उत्पादन घटत असून याला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले. गेल्यावर्षी या महोत्सवात एक कोटीच्यावर उलाढाल झाली होती. 2016 ला हाच आकडा दीड कोटी होता असे आ. केळकर यांनी सांगितले.