ठाणेकरांना जलदगतीने सेवा पुरविण्यासाठी अग्निशमन दलात अत्याधुनिक वाहने दाखल

0

ठाणे : आपत्तीजनक परिस्थितीत ठाणेकरांना अधिक जलदगतीने मदतकार्य पुरवता यावे यासाठी ठाणे अग्निशमन दलात ५ क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल आणि १ कंट्रोल पोस्ट व्हॅन ही अत्याधुनिक वाहने दाखल करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण करण्यात आले आहे.

वाढत्या नागरीकरणात ठाणे शहरात अनेक ठिकाणी आग लागणे, इमारत कोसळणे यासारखी आपत्तीची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी अग्निशमन दलातील सध्याच्या मदतकार्य करणाऱ्या वाहनांना अनेकदा घटनास्थळावर पोहोचून मदतकार्य करताना काही मर्यादा येतात. त्यावर मात करण्यासाठी अधिक सुसज्ज व नव्या सुधारित तंत्रज्ञानावर आधारित ५ क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल आणि १ कंट्रोल पोस्ट व्हॅन ही अत्याधुनिक वाहने अग्निशमन दलात सामावून घेण्यात आली आहेत. आर्यन पम्प्स व इन्व्हायरो सोल्यूशन्स या कंपनीने ही अत्याधुनिक वाहने निर्माण केली असून या वाहनांमध्ये आग विझविण्यासाठी वॉटर मिस्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कमी पाणी व जास्त हवेचा दाब या तत्वावर थंड करणे व दडपणे या अग्नीशमन विमोचनाचा वापर करून आगीवर प्रभावी नियंत्रण करण्याचे तंत्र या वाहनांमध्ये वापरण्यात आले आहे.

तसेच सदर वाहनांमध्ये ५०० लिटर्स पाणी व ५० लिटर्स फोम असून इतर आगीव्यतिरिक्त तेलजन्य व रासायनिक पदार्थांच्या आगीवरही नियंत्रण ठेवण्याचे तंत्र या वाहनामध्ये वापरण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या वाहनामध्ये मदत व शोध कार्यासाठी उपयुक्त ठरणारी कटींग, ब्रेकिंग, श्वसन उपकरणे, विविध प्रकारचे दोरखंड, अपघातग्रस्त वाहन खेचण्यासाठी विचगेअर, रात्रीच्यावेळी काम करता यावे यासाठी मास्ट लाईट आदी उपकरणेही असल्याने ती अधिक कार्यक्षमतेने मदतकार्य करू शकतील असा विश्वास अग्निशमन दलाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या सहा अग्निशमन केंद्रांच्या दळणवळणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक बिनतारी यंत्रसामुग्री असलेली कंट्रोल पोस्ट व्हॅनचेही अनावरण करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या नितीन कंपनी येथील मुख्यालयात सदर अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अग्निशमन सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात आले. याप्रसंगी महापौर मिनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, उपमहापौर रमाकांत मढवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेविका नंदिनी विचारे, रूचिता मोरे, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोककुमार रणखांब, उपायुक्त संजय निपाणे, संदीप माळवी, नगर अभियंता रतन अवसरमोल, मुख्य अग्निशमन अधिकारी काळे आदी उपस्थित होते.