ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा

0

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पदोन्नती, घोटाळा व भ्रष्टाचाराची सहकारमंत्र्यांनी चौकशी करावी असे निर्देश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. याच बँकेतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक करावी , या मागणीसाठी पालघर जिह्यातील रहिवाश्यांनी ठाण्यात मोर्चा काढला होता.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांनी कर्मचारी पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार केला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांच्यासह खासदार चिंतामण वनगा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, जिल्हा उपनिबंधक ठाणे यांच्याकडे केली होती. यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ठाणे जिल्हा उपनिबंधक यांना, याबाबत उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु सदर बँकेत मोठा घोटाळा झाला असून अनियमितता दिसत असून यामुळे त्याचा फटका ठाणे जिह्यातील सुशिक्षित तरुण, मच्छीमार, शेतकरी व बँक कर्मचारी यांना बसणार आहे; म्हणून मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीबाबत सहकारमंत्र्यांना उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. जूनमध्ये सदर बँकेत मोइा गैरव्यवहार झाला असून संचालक मंडळ व व्यवस्थापकांनी स्वतच्या नातेवाईक कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याची अनेक प्रकरणे नावांसहीत जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जाहीर केली आहेत. कोणतीही सेवा ज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता नसताना तसेच बँकेची संगणक प्रणाली सुरू असताना बँकेच्या संगणकप्रणालीचा वापर न करता पदोन्नती केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

संचालकांचे नातेवाईक कर्मचारी 12 वी पर्यंत शिक्षित असताना बँकेने त्यांच्यावर सातत्याने पदोन्नतीचा वर्षाव केला आहे. संचालक मंडळ, व्यवस्थापक व काही लोकप्रतिनिधींच्या अशा 34 नातेवाईक कर्मचाऱ्यांनाच बँकेकडून गेल्या 15 वर्षांत सातत्याने पदोन्नती दिली गेल्याची गंभीर तक्रार आहे. त्यामुळे गरीब व प्रामाणिक कर्मचारी उपेक्षितच राहिले आहेत. या बेकायदा पदोन्नत्या तात्काळ रद्द कराव्यात व निकष डावलून देण्यात आलेल्या 117 पदोन्नत्या रद्द करण्याची मागणी आता तक्रारकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याचाच अर्थ ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शैक्षणिक पात्रता, जात, संवर्ग, सेवा ज्येष्ठता, वय या निकषांच्या आधारावर पदोन्नती होणे अपेक्षित असताना नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती देण्याचे कार्य बँकेत सुरू होते. संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी आपल्या मर्जीप्रमाणे सदर बँकेचा कारभार सुरू ठेवला होता. यात काही लोकप्रतिनिधींचे नातेवाईक कर्मचारी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचालक व व्यवस्थापकांनी केलेल्या गैरकारभाराविरोधात राज्य सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अजुनही बरेच घोटाळे असण्याची शक्यता आहे. काही नातेवाईकांकडून नोकरभरतीसाठी लाच घेतली असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. संबंधितांची अधिक चौकशी झाली तर जिल्हा बँकेतील अनेक घोटाळे उघडकीस येतील.

– प्रवीण शिंदे
वरिष्ठ उपसंपादक
जनशक्ति, मुंबई
9892784348