ठाणे । गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारच्या पूर्वीच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थानअभियानातंर्गत 39 मिडी बसेस ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यात आता ठाणेकरांसाठी आणखी एक आनंदाची खूशखबर आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात पुढील वर्षी पर्यावरण स्नेही वीजेवर चालणार्या 10 बसेस दाखल होण्याची शक्यता आहे. या बसेससाठी महापालिकेला एक पैसाही खर्च करावा लागणार नसून लोकसहभागातून या बसेस परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
विनामूल्य वायफायचीही सुविधा
ठाण्यातील वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दोन वर्षापूर्वी अशा बसेसची कल्पना मांडली होती. या बसेससाठी ठाणे महानगरपालिका एकही खर्च करणार नाही. या बसेस वातानुकुलित असून त्या पुढील वर्षी परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेसमध्ये जीपीएस, वातानुकुलित यंत्रणा, विनामूल्य वायफाय सुविधा दिली जाणार आहे. सध्या या बसेसची फिटनेस चाचणी सुरू असून लवकरच या बसेस उपलब्ध होतील. या बसची खरेदी, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्याची देखभाल संबंधित कंपनीच करणार आहे. महापालिकेला फक्त या बस उभ्या करण्यासाठी जागा द्यावी लागणार आहे.
बसच्या चार्जिंगसाठी आनंदनगर जकात नाका आणि बस आगारांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बस 180 किलोमीटर धावू शकते. या बस वीजेवर चालत असल्यामुळे या बसमधून कोणतेही प्रदूषण होणार नसल्यामुळे या बस पर्यावरणस्नेही ठरणार आहेत.