ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात आता आणखी 39 मिडी बसेस

0

ठाणे । केंद्र सरकारच्या पूर्वीच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान अभियानातंर्गत मंजूर झालेल्या 190 बसेसपैकी उर्वरित 50 मधील 39 मिडी बसेस गुरुवारी ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, परिवहन समिती सभापती अनिल भोर आदी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आनंदनगर डेपो येथील डिझेल पंपाचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या पूर्वीच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान अभियानातंर्गत ठाणे परिवहन सेवेसाठी एकूण 190 बसेस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी 140 बसेस यापूर्वीच परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरित 50 बसेसपैकी 39 बसेसची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आज त्या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. या सर्व बसेस मिडी बसेस आहेत.

यांची होती उपस्थिती
आनंदनगर ओवळा येथे झालेल्या या समारंभास स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर, साधना जोशी, अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे, परिवहन सदस्य प्रकाश पायरे, साजन कासार, राजेंद्र महाडीक, सचिन शिंदे, तकी चेऊलकर, परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी उपस्थित होते.