ठाणे पाण्यात; जनजीवन विस्कळीत

0

ठाणे। मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात वसई, विरार, नालासोपारा या भागात तुफान पाऊस कोसळत आहे. या भागात सर्वत्र पाणी साचल्याने लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. महत्वाच्या कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन रेल्वे व्यवस्थापक रमेश प्रधान यांनी केले. कामावर जाणा़र्‍या लोकांना सुट्टी घेऊन घरीच थांबावे लागले आहे. वसई-विरार परिसरात बागायती शेतीचे फार मोठे नुकसान झाले असून भातशेतीही लांबणीवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाचा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही झाला असून भूज एक्सप्रेस, जामनगर एक्सप्रेस, लोकशक्ती एक्सप्रेस या गाड्या विरार स्थानकातच थांबल्या आहेत. जयपूर वांद्रे अरावली एक्सप्रेसही खोळंबली आहे. ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी द्यायची आवश्यकता असल्यास मुख्याध्यापकांनी त्याबाबत निर्णय घ्यावा. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तालुका किंवा शहराच्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा, कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन करण्यात आले आहे.ठाणे आणि कळवा परिसरातही जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे कळव्यात जमीन खचली आहे. जमीन खचल्यानं तीन घर नाल्यात पडली आहेत. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कळवा पूर्व घोळाई नगर येथे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर प्रशासनानं नाल्याच्या बाजूला असलेल्या घरांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबई, ठाण्यासह कोकणात सर्वत्र पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे सीईओ, जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओ, सार्वजनिक बांधकाम खाते, एमएमआरडीए, एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांना विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्2या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये भरल्यावर खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे खड्ड्यांची गांभीर्याने नोंद घेऊन त्वरित खड्डे बुजवण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. खड्ड्यांच्या बाबतीत लोकांच्या तक्रारी आल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित खड्डे बुजवण्यासाठी पावले उचलावीत, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुरबाड शहरात गेल्या दोन दिवसा पासुन दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची ओरड नागरिकांकडुन होत आहे मात्र मुरबाड मधिल नविन पाणीपुरवठा योजनेला फिल्टर असताना अचानक दुषित पाणी मिळत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही हे समजणे कठिण झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुरबाड मध्ये गेल्या दोन दिवसा पासुन मुसळधार पावसाने झोडपुन काढल्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी आले होते. ठिकठिकाणी नंगरपंचायत माध्यमातुन कॉक्रीट रस्ते, पेव्हर बॉल्क, गटारी यांची कामे सुरु आहेत हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत असताना बर्‍याच वेळा पाईप लाईन तुटल्याचे पावसामुळे उघड झाले. काम करताना पुन्हा दुरुस्त केले किंवा नाही याची कल्पना नसताना जपान बनावटीचे फिल्टर प्रक्रिये वर शंका उपस्थित करण्यात येत आहे़. मुरबाड शहरात नविन पाणीपुरवठा योजना व त्यातुन मिळणारे शुध्द पाणी यामुळे नागरिक खुश होते मात्र गेल्या दोन दिवसाच्या अशुध्द पाणीपुरवठा मुळे या योजनेच्या फिल्टर प्रक्रियेवरच प्रश्‍न चिन्ह निर्माण झाल्याने लिकेज पाईप लाईन अथवा फिल्टर चा दोष दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडुन होत असुन दुषित पाण्यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे तोंडलीकर नगरमधिल रहिवासी नारायण धुमाळ यांनी याबाबत तक्रार देखिल केली असुन आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास नगरपंचायत जबाबदार असल्याचे त्यानी सांगितले.

साकेत पुलावर मोठी चीर
ठाण्यातल्या भिवंडी साकेत पुलावर मोठी चीर गेली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंब्रा बायपास रोडही बंद असल्यामुळे साकेत पुलावरून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या पुलाला तडे गेल्यानंतरही वाहतूक सुरुच आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का अशी विचारणा होते आहे. लवकरात लवकर या पुलाची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.ठाण्यातील राबोडी भागात 30 फूट उंचीची भींत कोसळली आहे. यात चार दुचाकी आणि एका रिक्षाचं नुकसान झालं आहे. कोकणी कबरस्थानची ही भींत आहे. सुदैवान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे.

शॉक लागल्याच्या घटना

एकीकडे पाऊस थांबयाचे नाव घेत नाही त्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभाराचा ञास किती लोकांनी सहन करायचा असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. तालुक्यात लाखो रुपये खर्च करुन देखील तारा तुटणे , जनित्र नादुरूस्त होणे , शॉक लागुन गुरु ढोर मरणे, माणूस मरणे असे अनेक प्रकार झाले आहे . आज सोमवार दिनांक 9 जुलै रोजी माजगांव येथील एक मुलगा म्हैस चारण्यासाठी जंगलात घेऊन गेला असता पोल वरुन तुटलेल्या उच्च दाबाच्या तारेचा तीव्र झटका लागून त्यातील एक म्हैस जागेवरच ठार झाली माजगांव येथील शेतकरी सुरेश देऊ पष्टे यांचा मुलगा उमेश हा आज सकाळी आपल्या म्हैस चरण्यासाठी जंगलात गेला असता . त्या ठिकाणाहून गेलेली उच्च दाबाची विद्युत तार तुटलेली होती . या तारेचा शॉक त्याच्या म्हसीला लागून म्हैस जागेवर ठार झाली, तर त्यांच्या मुलाला देखील साधारण शॉक लागला आहे . या घटनेमुळे विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा एका शेतकर्‍याला बसला आहे. याबाबत उपविभागीय अभियंता मुरबाड दवंगे यांना फोनवर संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही . तर प्रभारी कार्यकारी अभियंता अञे यांनी सांगितले की पंचनामा करून त्या शेतकर्‍याला मदत दिली जाईल.