ठाणे, पुणे संघासमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान

0

चिपळूण । रोटरी क्लब चिपळूण व चिपळूण तालूका खो-खो संघटना आयोजित 45 व्या कुमार व मुली (18 वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी आमदार चषक खो-खो स्पर्धेला शनिवारपासून जोशी मैदान, भोगाळे, चिपळूण येथे सुरूवात होत आहे. राज्यभरातून मुला-मुलींचे प्रत्येकी 23 जिल्हासंघाचा सहभाग असलेल्या स्पर्धेत विजेतेपद राखण्याचे आव्हान ठाणे आणि पुणे संघासमोर असणार आहे. गतवर्षी अहमदनगर येथील शेवगाव येथे झालेल्या स्पर्धेत ठाणे संघाने कुमार गटाचे विजेतेपद मिळवले होते. तर मुलींमध्ये पुणे संघ विजयी ठरला होता. या स्पर्धेतून मणिपूर येथे आयोजित राष्ट्रीय खो-खो स्पर्धेकरीता संघ निवड होणार असल्याने चिपळूणकरांना चुरशीच्या रंगतदार खो-खो सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. स्पर्धेतील सामने सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 4 ते 10 अशा दोन सत्रात खेळवण्यात येणार असून या चारदिवसीय स्पर्धेत पहिले दोन दिवस साखळी व तद्नंतर बाद पद्धतीने सामने होतील. स्पर्धेकरीता तीन मैदाने व प्रेक्षकांसाठी सुसज्ज गॅलेरीची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे हस्ते होणार आहे चिपळूणात प्रथमच राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन होत असल्याने स्थानिक नागरिकांना स्पर्धेविषयी खूपच उत्सुकताआहे अशी माहिती रत्नागिरी खो-खो संघटनेचे सचिव संदीप तावडे यांनी दिली.

कुमार अ गट : ठाणे, परभणी, जळगाव. ब गट : मुंबई उपनगर , औरंगाबाद, रायगड. क गट : पुणे , रत्नागिरी, नंदूरबार. ड गट : मुंबई , उस्मानाबाद, नांदेड. इ गट : सांगली, धुळे , पालघर. फ गट : नाशिक, हिंगोली, जालना. ग गट : सातारा, बीड, सिंधुदूर्ग .ह गट : अहमदनगर, सोलापूर, लातूर.

मुली अ गट : पुणे, रायगड, जालना. ब गट : ठाणे , बीड , हिंगोली. क गट : सातारा, औरंगाबाद, परभणी. ड गट : सांगली , नाशिक, पालघर. इ गट : अहमदनगर, धुळे, सिंधुदूर्ग. फ गट : रत्नागिरी, जळगाव, लातूर. ग गट : मुंबई उपनगर, उस्मानाबाद, नांदेड. ह गट : मुंबई, सोलापूर, नंदूरबार.