ठाणे । देशात माहिती संरक्षण कायदा (डाटा प्रोटेक्शन लॉ) आल्यानंतर सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक परिणामकारक पावले उचलली जाऊ शकतील व अशा गुन्ह्यांना आळाही बसेल. परंतु तोपर्यंत एक नागरिक म्हणून आपण विविध मोबाइल अॅप्स आणि वेबसाइटवर वैयक्तिक माहिती देतांना तिचा गैरवापर होणार नाही याची खात्री असेल तरच माहिती द्यावी, असे प्रतिपादन सायबर गुन्हे अधिवक्ता अॅड. राजस पिंगळे यांनी केले. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे) डॉ. संदीप भाजीभाकरे तसेच कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अंर्तगत पत्रकार आणि माध्यमांसाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम सुरू आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर कक्ष आणि जिल्हा माहिती कार्यालय ठाणे यांच्या वतीने आज पार पडलेल्या या कार्यशाळेत पत्रकारांनी याविषयी शंका समाधान करवून घेतले तसेच सायबर कायद्याच्या उपयुक्ततेविषयी अधिक माहितीही घेतली. प्रारंभी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत सायबर जागृती कार्यक्रमाची का आवश्यकता आहे ते सांगितले. माध्यमांनी यात जबाबदारीची भूमिका घेणे गरजेचे असून सर्वसामान्यांपर्यंत सायबर गुन्ह्यांबाबत अधिकाधिक माहिती पोहोचवून लोकांना सज्ञान करावे असे ते म्हणाले.
सोशल मीडिया लॅब स्थापणार
याप्रसंगी बोलताना सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सायबरविषयक जागृतीत त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन माध्यमांना केले. पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सायबर जाणीवजागृतीसाठी शाळा महाविद्यालयातून कसे प्रयत्न केले जात आहेत ते सांगितले. आर्थिक आणि सायबर गुन्हे कसे केले जातात याची उदाहरणे देतांना त्यांनी नुकत्याच झालेल्या विवाहस्थळांच्या वेबसाइटवरील फसवणूकीची प्रकरणे, इंटरनेटवरील माहितीचा आधार घेऊन केलेले गुन्हे यांची उदाहरणे दिली. सायबर गुन्हे करणारे लोक कसे हुशारीने आणि चलाखीने लोकांना फसवितात त्यापासून सावध कसे राहायचे याच्या टिप्स त्यांनी दिल्या. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर लॅबचे काम कसे सुरू आहे सांगताना त्यांनी सोशल मीडियाच्या अनुषंगानेदेखील निरीक्षण आणि विश्लेषण करणारी एक अद्ययावत लॅब सुरू करणार असल्याचे सांगितले.
कुठलीही माहिती सुरक्षित नाही
कार्यशाळेत अॅड. राजस पिंगळे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात याची उदाहरणांसह माहिती दिली. ते म्हणाले की, इंटरनेट स्वस्त आणि सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात आपली वैयक्तिक माहिती कुठे ना कुठे मोबाइलवर अॅप्स आणि वेबसाइटच्या माध्यमातून टाकत असतो. पण या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. कुणी कितीही सांगितले तरी महाजालातील माहिती पूर्णत: सुरक्षित असतेच असे नव्हे. आता इंटरनेट ऑफ थिंग्स(आयओटी) चा जमाना आहे. अनेक घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये इंटरनेटची सोय आहे . याठिकाणी देखील काही माहिती टाकतांना आपण काळजी घेतली पाहिजे. आज 1700 पेक्षा जास्त क्रिप्टो करन्सी बाजारात आहेत. ती प्रचंड महाग असली तरी अनेकदा धोक्याच्या सूचना देऊनही श्रीमंत लोक यात गुंतवणूक करुन स्वत:चे नुकसान करून घेत आहेत, यापासून दूर राहिले पाहिजे. सोशल मीडियावर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करण्यापूर्वी आपण पुरेपूर विचार केला पाहिजे. काही दिवसांपासून बँकेच्या एटीएम्समधून फसवणूक करून पैसे काढण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये ग्राहकाने सावधानता बाळगायची आहे. परंतु, बँकेचीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने मोठी जबाबदारी आहे, ग्राहकाची चूक नसेल तर नियमाप्रमाणे विशिष्ट दिवसांत त्याला पैसे मिळणे आवश्यक आहे, असेही राजस पिंगळे यांनी सांगितले.