ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू

0

भिवंडी : मुंबई-ठाण्याप्रमाणेच भिवंडी व कल्याणमधील लाखो नागरिकांचे `मेट्रो’चे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. `एमएमआरडीए’ने ठाण्यापर्यंत येणारी मेट्रो भिवंडी व कल्याण शहरात नेण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात निविदा काढण्यात आल्या असून, निविदा प्रक्रियेनंतर दोन महिन्यांत सर्वेक्षण करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. या मेट्रोसाठी भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

वडाळ्याहून ठाण्यातील कासारवडवलीपर्यंत मेट्रोला सरकारने मंजुरी दिल्यानंतर, मेट्रोचा मार्ग भिवंडी-कल्याणपर्यंत नेल्यास मेट्रो आणखी फायदेशीर होईल. या भागातून मेट्रो नेल्यास वाहतूककोंडीचा प्रश्नही मिटू शकेल, याकडे खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे सप्टेंबरमध्ये लक्ष वेधले होते. भिवंडी तालूका व कल्याण शहराचा वेगाने विकास होत आहे. मुंबई-ठाण्यातून हजारो चाकरमानी दररोज भिवंडी-कल्याण परिसरात कामासाठी येतात. मात्र, सध्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांना मर्यादा असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे मेट्रो गरजेची असल्याचे खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भिवंडी व कल्याण शहराच्या कायापालटासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक 5 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून `एमएमआरडीए’ने ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक 5 ची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार `एमएमआरडीए’ने मार्गावरील जमिनीचे इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन डि. पी. जी. पी. एस. सर्वेक्षण, सिमांकन करणे, झाडांचे (प्रकार, उंची, बुंध्याचा व्यास), बांधकामांची तपशीलवार माहिती घेणे, ड्रोन कॅमेऱ्याने मोजणी करून भौगोलिक संदर्भासह नकाशा तयार करणे, जमिनीच्या मोजणी नकाशावर पुनर्विलोकन आलेख व टिकाशीट सुपर इंपोज करणे आदी सर्वेक्षण कामे करण्यासाठी निविदा काढली आहे.

येत्या 17 एप्रिलपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत दिली असून, कार्यादेश दिल्यानंतर दोन महिन्यांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावयाचे आहे. या सर्वेक्षणाच्या कामामुळे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचे पहिले पाऊल पडले असल्याचे मानले जात आहे.

…असा असेल मेट्रोचा मार्ग व स्थानके
ठाण्याहून भिवंडी-कल्याणकडे जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गावर 17 स्थानके
असतील. ठाण्याहून कापूरबावडी, बाळकूम नाका, कशेळी, काल्हेर, पुर्णा,
अंजूर फाटा, धामणकर नाका, गोपाळनगर, टेमघर, रांजणोली गाव, एमआयडीसी,
गोवे, कोन, दुर्गाडी, सहजानंद चौक, कल्याण स्थानक आणि कल्याण एपीएमसी
स्थानके राहतील. या 24.1 किलोमीटरच्या मार्गासाठी आठ हजार 416 कोटी रुपये
खर्च येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.