ठाणे : राज्य कारभार मराठी भाषेत व्हावा म्हणून प्रयत्न होत असताना ठाणे शहरात मात्र नागरिकांसाठी उभारलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांवरील फलक चक्क इंग्रजी भाषेत आहेत. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना मराठी भाषेची अशाप्रकारे गळचेपी होणे याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तरी या शौचालयांवरील नामफलक तात्काळ मराठी भाषेत लिहावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष (ओवळा-माजिवडा विधानसभा) पुष्कराज विचारे यांनी या संदर्भात ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन सदर मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात तसेच ठाणे शहरातही सदर अभियान राबविले जात आहे. स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ ठाणे’ या मोहिमेंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र 5 मध्ये शौचालय उपलब्ध करून देण्यात आले आहे, परंतु या शौचालयावर कुठेही मराठी भाषेतील नामफलक नाही. ठाणे महापालिकेला मराठी भाषेचा इतका दुस्वास का? असा सवाल करून सदर योजना केंद्र सरकारची असो अथवा राज्य सरकारची असो त्यावर मराठी भाषेतच नामफलक हवा अशी आमची आग्रही मागणी असल्याचे विचारे यांनी नमूद करून अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.