ठाणे, मुलंडमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा आता थेट दाराशी!

0

मुलुंड | फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी मुलुंडमधील वामनराव मुंजारन विद्यालयाच्या आवारात आपल्या ‘क्लिनिक ऑन व्हील्स’ सेवेचे बुधवारी उद्घाटन केले. ‘क्लिनिक ऑन व्हील्स’च्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत बाह्यरुग्ण सेवा तसेच वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. आठवड्याचे सहा दिवस सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे फिरते क्लिनिक बोलावल्यास्थळी हजर होईल. हा उपक्रम मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलचे वृद्धोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू करण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
या सेवेच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावर चंद गेहलोत प्रमुख पाहुणे होते. खासदार डॉ. किरीट सोमय्या, मुलुंडचे आमदार सरदार तारा सिंग, नगरसेवक आणि भाजपचे गटनेते मनोज कोटक, वॉर्ड क्र. 108 चे नगरसेवक नील सोमय्या आणि युवा प्रतिष्ठानच्या महासचिव डॉ. मेधा सोमय्या, ‘फोर्टिस’चे वरीष्ठ व्यवस्थापक व मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलचे क्षेत्रीय संचालक डॉ. एस. नारायणी व डॉ. हिरेन आंबेगावकर हे उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात तीनशेहून अधिक जबाबदार नागरिकांनी हजेरी लावली; त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला.

या सुविधा घरपोहोच
या क्लिनिकद्वारे पुरविल्या जाणार्‍या सुविधांमध्ये ईसीजी तपासणी, रक्त आणि साखरेची सर्वसाधारण तपासणी, रक्तदाब तपासणी यांचा समावेश आहे. प्रशिक्षित वृद्धोपचारतज्ज्ञ आणि परिचारक यांच्याद्वारे चालविल्या जाणार्‍या या फिरत्या दवाखान्यात आणीबाणीच्या वेळी अत्यंत गरजेच्या ठरणार्‍या ऑक्सिजनचा पुरवठाही उपलब्ध असेल. याखेरीज विशेष गरजा असलेल्या रुग्णांसाठी व्हीलचेअरही उपलब्ध असेल.

असे असेल वेळापत्रक…
सोमवार ते शनिवार
सकाळी 7 ते संध्याकाळी 7

916701122
क्लिनिक ऑन व्हील्स सेवा आपल्या दाराशी बोलावण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधून वेळ निश्चित करता येईल.

”व्यापक अर्थाने एक समाज म्हणून आपल्या ज्येष्ठांच्या स्वास्थ्याप्रती आपली जबाबदारी आपण पार पाडणे हे महत्त्वाचे आहे. घरच्या घरी आरोग्य सेवेची गरज असलेल्या ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. आमची प्रशिक्षित टीम अशा ज्येष्ठांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सक्षम आहे व ही टीम या भागातील ज्येष्ठ नागरिकांना शक्य तितकी उत्तम आरोग्य सेवा पुरवेल.”
– डॉ. श्रीनिवास ठाकूर, उपक्रमाचे शिल्पकार

”या सेवेमुळे समाजातील आमच्या मित्रांना घरच्या घरी आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल. या मोफत सेवेद्वारे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्हाला पोहोचता यावे अशी आशा मी व्यक्त करतो.”
डॉ. एस. नारायणी,
क्षेत्रीय संचालक, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड

फोर्टीस हेल्थकेअर
भारत, दुबई, मॉरिशस व श्रीलंका या देशांत विस्तार; हॉस्पिटल्स, निदान आणि डे केअर स्पेशालिटी सेवा यांचा समावेश.

45 – हॉस्पिटल्स

368 – निदान केंद्रे

10,000 – बेड्स