ठाणे, रायगडमध्ये मुसळधार

0

मुंबई । प्रदीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर मुंबई, ठाण्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुसळधार पावसाचा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह रायगड व विदर्भाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसाच्या या तडाख्यामुळे मुंबई, ठाण्यातील पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. तर, विदर्भात बरसणार्‍या पावसाने तिथले दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकले आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात शनिवारी सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. भांडुप व कांजूर या भागात रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू होती. ठाणे जिल्ह्यासह रायगड, पालघरला पावसाने बर्‍याच दिवसानंतर दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण व चिरनेर येथे सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता.

मराठवाडा, विदर्भात बरसला
मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि जालना आदी ठिकाणी शुक्रवारी रात्री पावसाचे पुनरागमन झाले. शनिवारी पहाटेसुद्धा मराठवाड्यासह मुंबई आणि विदर्भात पावसाने हजेरी लावली. पुणे शहरातही शनिवारी सकाळी पावसाच्या सरी पडल्या. तथापि, जिल्हा मात्र कोरडाच होता. पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाने तुरळ हजेरी लावली असली तरी, ग्रामीण भागात मात्र गरज असतानाही त्याने दडी मारली होती. रविवारीसुद्धा मराठवाडा, विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविलेला आहे.

जोरदार पावसाची शक्यता
आज 20 ऑगस्टरोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. उद्या 21 ऑगस्टरोजी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोव्यात व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक दठकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

24 तासांत 141.9 मि.मी.ची नोंद
नागपूरसह विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. नागपुरात गेल्या 24 तासांत 141.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, अकोलामध्ये पावसानं चांगली हजेरी लावलीय. नागपूर शहरात काही ठिकाणी पाणी तुंबल्यानं वाहतूक वळविण्यात आली आहे.