ठाणे : पावसाळ्यामध्ये शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येणार आहे. ३१ मे पर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रातील लहानमोठ्या तब्बल ३०६ नाल्यांची सफाई अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. ही नालेसफाई करताना ठेकेदाराकडून ‘हातसफाई’ होऊ नये यासाठी नालेसफाईच्या कामांवर जिओ टेग आणि जीपीएस सिस्टीमद्वारे महापालिका ‘नजर’ ठेवून असणार आहे.
नालेसफाई करण्यासाठी महापालिकेने ३१ मे ही डेडलाईन ठरवली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जीपीएस सिस्टीमद्वारे नालेसफाईच्या कामावर ‘नजर’ ठेवण्याचे निर्देश सबंधित पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. नाल्यांच्या सफाईपूर्वी आणि सफाईनंतरचे फोटो आणि व्हिडीओ शुटींग करणे बंधनकारक असून त्यासाठी पालिकेने जिओ टेग आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नालेसफाईची दैनंदिन माहिती जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात येणार असून त्यामध्ये नालेसफाईचे फोटो तत्काळ अपलोड करून प्रशासनाद्वारे दैनंदिन कामाचा आढावा घेतला जाणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारची ट्रॅक सिस्टीम यावर्षी प्रथम तयार करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ठाणे महापालिका हद्दीत लहानमोठे सुमारे ३०६ नाले असून त्यातील १३ नाले मोठे आहेत. त्यांची एकूण लांबी ११९ किलोमीटर आहे. यंदा नालेसफाईच्या कामासाठी सुमारे ९ कोटींच्या निविदाप्रक्रिया सुरु झाली असून काही दिवसात त्याचे कार्यारंभ आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मे महिन्यापासून पावसाळा संपेपर्यंत पाणी तुंबल्यास अथवा नुकसान झाल्यास त्यासाठी ठेकेदाराला जबाबदार धरण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढणार आहे.