ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठामपाने व खासदार, आमदार निधीतून बांधलेल्या वास्तूंची निगा राखण्याचे काम यापुढे महानगरपालिका करणार नसल्याचे दिसत आहे. ठामपाच्या एका बैठकीत तसे ठरले असून, खासगी संस्थांमार्फत ठामपा या वस्तूंची देखभाल करणार आहे. ठाणे क्षेत्रातील सुविधा भूखंडांवर किंवा आरक्षित भूखंडांवर खासदार व आमदार निधीतून तसेच ठामपाच्या तिजोरीतून अनेक लोकोपयोगी सुविधाक्षम रुग्णालय, मिनी स्टेडियम, तरण तलाव, व्यायामशाळा, रात्र निवारे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आदी वास्तू उभ्या केल्या आहेत तसेच विविध प्रकारची उद्याने, थीम पार्क, चौपाटी, खेळाची मैदाने, पार्क नागरिकांच्या सोयीसाठी ठामपाने उभे केले आहेत ही बाब स्तुत्यच आहे. नागरिकांना विविध सोयी मिळवून देणे हे ठामपाचे आद्यकर्तव्य आहे. परंतु, ठाणे महापालिकेने या वास्तूंची निगा राखण्याची जबाबदारी स्वतःवर न घेता खासगी संस्थांकडून करून घेण्याचा जो निर्णय आहे, तो खटकतो. आता केंद्र सरकारपासून ते अनेक महापालिकांनी खासगी संस्थांच्या साहाय्याने कारभार करण्यास सुरुवात केली आहे. त्यात काय विशेष, असाही सवाल काहीजण करतील. परंतु, ठाणे महापालिकेने या वास्तूंची निगा जर स्वतःच आपल्या कर्मचार्यांकडून केली तर ठामपाच्या तिजोरीतील पैशांची बचत होईल, असे वाटते. आपण एखादी गोष्ट तयार करायची आणि खासगी कंपनी कडे सोपवायची यामुळे नागरिक व ठामपातील सुसंवाद कमी होण्याचा धोका अधिक वाटतो. खासगी संस्था ठामपाच्या वास्तूंमधील सुविधा देण्यासाठी शुल्क आकारणार व त्यातून ते फायदा काढणार, यात शंकाच नाही. कारण विनाफायदा खासगी संस्था दुसर्याच्या इमारती, उद्याने, पार्क आदी यांची निगा कशाला राखतील? ठाण्यातील नियोजित जलपरिवहन प्रकल्प किंवा असे मोठे प्रकल्प यांच्याबाबतीत खासगी संस्थांच्या साहाय्याची निकड आपण समजू शकतो. परंतु, नागरिकांना सुविधा देण्यासाठी ठाणे महापालिकेने बांधलेल्या इमारती, उद्याने, रुग्णालये आदी वास्तूंची देखभाल स्वतः ठामपा का करू शकत नाही? असा प्रश्न जाणकार ठाणेकरांसमोर उभा आहे. ठाणे महापालिका विविध मोठे कार्यक्रम करते, इव्हेंट घेते. अशावेळी व्यवस्थापन ठामपाकडूनच केले जाते. ठामपाने योग्य नियोजन केले, तर या सुविधादायक वास्तूंची देखभाल सहज होऊ शकते.
ठाणे महापालिकेचे त्यासाठी काही कर्मचारी व अधिकारी नेमले तर हा प्रश्न त्वरित सुटेल. ठाणे महापालिका प्रशासनाला यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे असे वाटते. लोकांसाठी सुविधा निर्माण केल्यानंतर त्याचे योग्य नियोजन स्थानिक स्वराज्य संस्थेने स्वतः करणे गरजेचे असते. कारण नागरिकांना योग्य सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थाच देऊ शकते अन्यथा खासगी संस्थेच्या हातात लोकोपयोगी सुविधांची देखभाल गेली, तर त्याचा जास्तीत जास्त फायदा खासगी संस्था घेणार, यात तिळमात्र शंका नाही. खासगी संस्था व इतर प्रकारच्या संस्था या प्रत्येक बाबतीत त्यांचा नफाच पाहण्याची शक्यता जास्त असते. मुंबई महानगरपालिकेतील अनेक उद्यानांची देखभाल खासगी संस्थांकडे आहे. परंतु, मुंबईत येणार्या खास पर्यटकांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी संस्थांकडे कारभार देऊन आपण नामानिराळे होण्यात शहाणपण दिसत नाही. यासाठी ठामपाने प्रचंड इच्छाशक्ती बाळगली पाहिजे. अखेर निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाला घ्यायचा आहे.
अशोक सुतार – 8600316798