ठाणे शहरात लोकसहभागाने स्वच्छता हीच सेवा अभियान उत्साहात

0

सर्व प्रभाग समित्यांमध्ये स्वच्छता मोहीम, नागरिक, नगरसेवक, अधिकारी सहभागी, स्वयंप्रेरणेने उपक्रम

ठाणे  । स्वच्छ भारत अभियानातंर्गत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात ’स्वच्छता हीच सेवा’ अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. सकाळपासून सर्व प्रभागसमिती अंतर्गत नागरिक, नगरसेवक, अधिकारी आणि विद्यार्थी यांनी हातात झाडू घेवून या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदविला. नागरिकांनी स्वताहून स्वच्छता ही आपली जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे हे दाखवून दिले. या मोहिमेला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाने परिसर चकाचक झालेला दिसून आला.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दोन दिवसांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते या अभियानाची सुरूवात झाली होती. रविवारी सर्व शहरभर विविध स्तरावर या हे अभियान राबविण्यात आले. २ ऑक्टोबर २०१७ पर्यंत हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. सकाळपासून महापालिका क्षेत्रातील सर्व शौचालये, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, शासकीय कार्यालये, रस्ते आदी ठिकाणी नागरीक, नगरसेवक, अधिकारी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, विद्यार्थी यांनी एकत्र येवून स्वच्छता केली.

अभियान सुरूच राहणार
या मोहिमेतंर्गत आज शहरातील सर्व रस्ते, चौक स्वच्छ करण्यापासून ते प्लास्टिक बंदी पर्यंत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. याबाबत नागरिक आणि गृहनिर्माण संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांच्यांशी समन्वय साधून हे स्वच्छता अभियान यापुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले.