ठाण्याच्या सरकारी रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी

0

अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल

ठाणे – ठाणे सरकारी रुग्णालयातून शनिवारी मध्यरात्री नवजात बालक हे अज्ञात महिलने चोरून नेले आहे. जन्मलेले बाळ अवघ्या ६ तासांत गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून सरकारी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था रामभरोसेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोहिनी मोहन भुवर (१९, भिवंडी, रा. भादवाड गाव) या ठाण्यातील सरकारी रुग्णालयात शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास दाखल झाल्या होत्या. रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्रसुती झाली. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना लेबर वार्ड प्रसूती कक्षात पाठविण्यात आले. पहाटे पावणे पाचच्या सुमारास त्यांना आपले नवजात बालक चोरीला गेल्याचे लक्षात आले.

रुग्णालय प्रशासनाला याबाबत विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पतीसह ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नवजात बालक चोरीला गेल्याचे समजताच ठाणे नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलिसांसमोर त्यांनी ठिय्या आंदोलन केले. रुग्णालयाचे शल्य चिकित्सक जागेवर उपस्थित नसल्याचा आरोप यावेळी मनसेने केला. जबाबदार अधिकारी या प्रकरणावर उत्तर देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा मनसेने प्रशासनाला इशारा दिला. ठाणे नगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयाच्या मुख्यप्रवेश दारातून एक महिला एका मुलीसह बाळ घेऊन जात असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नाकोडे यांनी सांगितले की, रुग्णालयात ५० सुरक्षारक्षक नेमण्याबाबत उपसंचालिका रत्ना रावखंडे यांच्याकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. ठाणे नगर पोलिसांनी रुग्णालयातील आरोपीचे सीसीटीव्हीत कैद झालेले छायाचित्र चित्र घेतले आहे. याप्रकरणी नियुक्त करण्यात आलेले ठाणे नगर पोलिसांचे ४ पथके आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान उपसंचालिका रत्ना रावखंडे यांनी पदभार घेतल्यानंतर रुग्णालयातील भोंगळ कारभाराचे अनेक नमुने समोर आले होते. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रावखंडे यांना अनेकवेळा अभय दिल्याने ठाणे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरुच असल्याचे चित्र आहे.