ठाणे : कागदाच्या राज्यात काहीही चमत्कार होऊ शकतो. तीस वर्षापुर्वी माधव भगत नावाची व्यक्ती मरण पावली होती. पण ठाण्याचा विस्तार होत असताना त्याच व्यक्तीच्या नावे मोठा भूखंड असल्याने चारदा ही व्यक्ती जीवंत असल्याचे कागदोपत्री व्यवहार दाखवून कामे उरकण्यात आलेली आहेत. आता त्याच मृताच्या मुलांनी तक्रार केल्याने ह्या भुतचेष्टांचे भूत अनेकांच्या मानगुटीवर बसले आहे. कारण त्यात खोटी कागदपत्रे बनवणार्यांपासून ती स्विकारणार्या पालिका कर्मचार्यांच्याही गळ्याला फ़ास लागण्याची वेळ आलॊ आहे.
माधव भगत यांचे १९९६ सालातच निधन झालेले होते. पण त्यांच्या नावे पारसिक डोंगराजवळ एक मोठा भूखंड होता आणि तो विकसित करण्यासाठी एका बिल्डरने पुढाकार घेतला. माधव भगत यांच्या पॉवर ऑफ़ एटर्नीचा वापर करून २००२ मध्ये विकासाची योजनाही ठाणे महापालिकेला सादर करण्यात आली. पण ती स्विकारली गेली नाही. त्यामुळे २००४ सालात या बिल्डरने ती कागदपत्रे व अधिकार एका साळवी नावाच्या दुसर्या विकासकाला विकून टाकली. त्यानंतर मात्र चमत्कार घडला. ज्या ठाणे पालिकेने आधी कागदपत्रे नाकारली होती, त्याच विभागाने तीच कागदपत्रे स्विकारून विकासाला मान्यता दिली.
मजेची गोष्ट अशी, की या भूखंडासाठी बांधकामाला परवाना मिळवून नव्या बिल्डरने भलत्याच भूखंडावर बांधकाम सुरू केले होते. त्यामुळे माधव भगत यांच्या मुलाने तक्रार केली आणि एक एक भानगड उजेडात येत गेली. ज्या मुखत्यारपत्राच्या आधारे सर्व उद्योग करण्यात आला, ते माधव भगत यांनी आपल्या मृत्यूनंतर एक महिना लिहून दिल्याचेही नोंदी दाखवतात. बांधकाम व भूखंडाच्या व्यवहारात किती चमत्कार घडू शकतात, त्याचा हा एक नमूना आहे. आता ह्या प्रकरणाला वाचा फ़ुटलेली असून त्यात बिल्डर व पालिका कर्मचार्यांचे पितळ उघडे पडत चालले आहे.