ठाणे । ठाणे शहरात अनेक अनधिकृत इमारतींमध्ये बेकायदा थाटण्यात आलेल्या हॉटेल्स, बार, रेस्टॉरण्ट आता ठाणे पालिका प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. फायर परवाना म्हणजेच अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून या प्रकरणी लोकप्रतिनिधींचा असलेला दबाव झुगारून कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षात ठाणे शहरात बेकायदा हॉटेल, बार, रेस्टॉरण्टविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेवून ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. आठवडाभरात फायर परवाना सादर न केल्यास दसर्यानंतर पालिका सील ठोकण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत काही अधिकृत इमारतींची संख्या सोडल्यास बेकायदा इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनेक बेकायदा इमारतींमध्ये तळ तसेच पहिल्या मजल्यावर बार तसेच रेस्टॉरंट मोठ्या संख्येने सुरू आहेत. हॉटेल्स, बार, रेस्टॉरण्ट आदी आस्थापनांना पालिकेच्या अग्निशमन विभागाची एनओसी बंधनकारक आहे. अशी एनओसी असल्याशिवाय या आस्थापनांना उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाने परवाने देऊ नये, असे अभिप्रेत आहे. मात्र, ठाण्यातील बहुसंख्य हॉटेलमध्ये बेकायदा बांधकाम झालेले आहे. अनेक ठिकाणच्या इमारतींना ओसी, सीसीही नाही. बरीच हॉटेल्स आणि बार बेकायदा इमारतीत आहेत. टेरेसवर आणि व्हरांड्यात बेधडक टेबल थाटलेली आहेत. नियमानुसार अशा आस्थापनांना फायर एनओसी देता येत नाही. त्यानंतरही येथील व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे.
पालिकेची स्वतंत्र पथके तयार
शहरातील बहुतांश हॉटेल आणि बार बेकायदा बांधकामांमध्ये सुरू असल्याने त्यांना अग्निशमन विभागाचे परवाने देण्याचा प्रश्नच येत नाही. अशा सगळ्या व्यावसायिकांना नोटिसा बजाविण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. वर्षातून दोन वेळा या आस्थापनांनी अग्निशमन दलाकडून एनओसी घेण्याचे बंधन पालिकेने घातले आहे. मात्र अर्ध्याहून आधिक आस्थापनांनी परवानगीच घेतली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी यावेळी दिली. तसेच हुक्का पालर्सवरही कारवाई करण्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. तसेच ठाणे पोलिसांनीही ठाण्यातील बेकायदा हॉटेल, बार, रेस्टॉरण्टवरील कारवाईसाठी ठाणे महापालिका प्रशासनाला सहकार्य करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
मालकांकडे परवानेच नाहीत
शहरातील 250 चौरस फुटापेक्षा जास्त जागा असलेल्या सर्व हॉटेलांना अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. शहरातील अनेक हॉटेल वापर परवाना न घेतलेल्या इमारतींमध्ये तसेच अनधिकृत इमारतींमध्ये आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि पागडी पध्दतीवरील जागेत सुरू आहेत. त्याच्याकडे वापर परवाने नाहीत. त्यामुळे अशा हॉटेल्सना सील करण्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही असेही महापालिकेतील अधिकार्यांने सांगितले. इमारतीच्या बेसमेंटचा वापर पार्किंग किंवा गोडावून व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी करता येत नाही. मात्र, त्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी बेसमेंटमध्ये हॉटेल आणि बार सुरू असल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणात आढळून आली होती.
दसर्यानंतर ठोकणार सील
ठाणे शहरात रस्ता रुंदीकरण, लेडीज बार, लॉजवरील कारवाई तसेच इमारतींची मार्जिनल स्पेस मोकळी करण्याची कारवाई सुरू असताना शहरातील बेकायदा इमारतींमध्ये थाटलेल्या हॉटेल आणि बारवरही कारवाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला होता. ठाण्यातील ज्या हॉटेल आस्थापनांकडे परवाने नाहीत अशांना सात दिवसांची नोटीस पाठवून परवानगीबाबत उचित कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. त्यानंतर जे हॉटेल मालक सात दिवसात कागदपत्र सादर करणार नाहीत त्यांच्या हॉटेलला दसर्यानंतर सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.