ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या

0

ठाणे : भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये या महिला कैद्याच्या हत्येचा प्रकार ताजा असतानाच ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात आरोपीने शनिवारी रात्री आत्महत्या केली. त्याने कोठडीतील स्वच्छतागृहाच्या लोखंडी गजाला टी-शर्टच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केलेला आरोपी बलात्कारप्रकरणात शिक्षा भोगत होता. या प्रकरणी कारागृहांतर्गत, न्यायलयीन, स्थानिक पोलीस तसेच गुन्हे अन्वेषन विभागालाही चौकशीसाठी कारागृह प्रशासनाकडून निवेदन देण्यात आले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील ही आत्महत्येची दुसरी घटना आहे. यापूर्वी ज्या कैद्याने आत्महत्या केली होती. तोदेखील बलात्कार प्रकरणातील आरोपी होता.

बलात्कारप्रकरणी झाली होती अटक
आशिष अनुप बरणवाल (22) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. तो डोंगरी-वसई येथील रहिवासी असून त्याला अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी वाळूंज पोलिसांनी अटक केली होती. गेल्या 1 वर्षापासून तो या तुरूंगात शिक्षा भोगत होता.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने चौकशी
आशिष याने कोठडीतील स्वच्छतागृहाच्या लोखंडी गजाला टी-शर्टच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. अन्य एक कैदी शौचालयात गेल्याने हा प्रकार उघडकास आला होता. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने चौकशी सुरु केली असून या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीसह स्थानिक पोलीस तसेच सीआयडीला चौकशीसाठी निवेदन देण्यात आले आहे.

पोलीस बळ कमी
ठाणे मध्यवर्ती कार्यालयात एकूण 3200 कैदी असून 197 पोलीस कर्मचारी आहेत. त्यातील फक्त 75 ते 100 कर्मचारी हे कैद्यांच्या देखरेखीसाठी आहेत. पोलिसांची ही संख्या अल्प असून 6 कैद्यांमागे 1 शिपाई असा नियम असताना यापेक्षा कितीतरी अधिक कैद्यांवर देखरेखीचा ताण इथल्या कर्मचार्यांवर आहे. कारागृहाची क्षमता 1100 कैद्यांची असून त्यात 3200 कैदी आहेत, तर त्यातुलनेत पोलीस बळ कमी आहे.