ठाण्यातील मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणा!

0

मुंबई । ठाण्यात अलीकडेच चालत्या रिक्षात महिलांवर अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर या विषयावरील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत शुक्रवारी ठाणे परिसरातील किसन कथोरे व संजय केळकर या आमदारांनी जोरदार आवाज उठविला. पुण्याच्या संग्राम थोपटे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्यांना साथ दिली. बेमुर्वतखोर, मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणा, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली. बस व रेल्वेस्थानकाबाहेर रिक्षाचालक दादागिरी करतात; ग्राहकांची पिळवणूक करतात. कल्याण-डोंबिवली, ठाणे परिसरात विना परमीट रिक्षा धावताहेत, याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. अत्याचाराच्या घटनेत भंगारात निघालेली, परमीट नसलेली रिक्षा वापरण्यात आल्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मान्य केले.

पोलीस-आरटीओ विसंवाद
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की आरटीओ व पोलीस यंत्रणेत समन्वयाचा अभाव आहे. त्यातून रिक्षाचालकांची मनमानी वाढत आहे. नौपाड्यात महिलांना जीव वाचविण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारावी लागतेय. ठाणे पोलिसांची स्मार्ट कार्ड योजना बंद पडलीय, ती तात्काळ सुरु व्हावी व सर्वत्र राबविली जावी. मागणीप्रमाणे परमीट फक्त घोषणा आहे. अजूनही कोटा पद्धत असून त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळलाय.

परमीट नसलेल्या अनधिकृत रिक्षांवरील कारवाईत सरकार अपयशी ठरत आहे.
– किसन कथोरे

ई-चलन पद्धत कधी सुरु होईल? 20 लाख लोकसंख्येच्या ठाणे शहराला फक्त 500 वाहतूक पोलीस कसे पुरे पडणार? रिक्षाचालकांचे जे काही खास अड्डे आहेत त्या परिसरातही सीसीटीव्ही लावायला हवेत.
– संजय केळकर

जीपीएसद्वारे नजर
या चर्चेला उत्तर देतांना गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑटोरिक्षा व टॅक्सीमधे जीपीएस प्रणाली लावण्यात येईल, असे आश्वासन दिले. ठाणे परिसरात 36 हजार परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. तसेच 30 हजार ऑटोरिक्षा धारकांकडे स्मार्ट कार्ड आहेत. नौपाडा घटनेनंतर पोलीस व आरटीओतर्फे विशेष तपासणी मोहीम राबविली गेली. यात 7212 ऑटोरिक्षा तपासण्यात आल्या. 104 ऑटोरिक्षांचा परवाना निलंबित केला असून 108 रिक्षाचालकांचे लायसन्स निलंबित केले आहे. 2016-17 मधून ठाण्यामधून 17 हजार वाहने दोषी आढळली तर 353 जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. 555 लोकांकडे परवाने नसल्याचे आढळले. 3 कोटी 47 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.