ठाणे : ठाण्यातील एका खासगी कंपनीच्या मदतीने निर्मिती केलेल्या यांत्रिक रोबोटमार्फत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस आता वाहतूक नियमांची जनजागृती करणार आहेत. येत्या 22 जानेवारीपासून हा रोबोट वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक पोलिसांसमवेत पहायला मिळणार आहे. मुलांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जागृती होण्यासाठी वेगळ्या प्रकारे हा उपक्रम राबवण्याची संकल्पना असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. एखादी बाब वेगळ्या प्रकारे मुलांमध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये रुजवली तर ती चांगल्या प्रकारे लक्षात राहते. यासाठी वेगळी कल्पना घेऊन साकारण्यात आलेल्या या यांत्रिक रोबोटमध्ये दोन स्पीकर, डिस्प्ले दिलेले आहेत. शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांसह मॉलमध्येही तो ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी येणार्या विद्यार्थ्यांसह वाहन परवानाधारक चालकांना तो वाहतुकीचे नियम आपल्या खास शैलीमध्ये सांगणार आहेत.
हे नियम पाळल्यामुळे आपला जीव कसा वाचू शकतो, हेही तो रोबोट सांगणार आहे. यामध्ये हेल्मेट परिधान करण्यापासून ते कार चालकांना सीट बेल्ट लावण्याचे धडेही तो देणार आहे. शिवाय, मुलांना झेब्रा क्रॉसिंगचे महत्व पटवून देण्याबरोबर वाहतूक चिन्हांचीही तो ओळख करून देणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या ब्रम्हांड येथील वैद्य यांच्याकडे निर्मिती झालेल्या या अनोख्या राबोटची वाहतूक पोलिसांना चांगलीच मदत होणार असल्याचा विश्वास उपायुक्त काळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काल तीन हात नाका येथे या रोबोटचे लाँचिंग करण्यात आले आहे. मात्र, त्यात पोलिसांना अपेक्षित काही दुरुस्त्या बाकी असल्यामुळे तो 22 जानेवारीपासून खर्या अर्थाने पोलिसांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.