ठाणे : ठाणे शहराच्या लौकिकात भर टाकणार्या इनडोअर जिम्नस्टिक सेंटर, वर्किंग वूमेन्स हॉस्टेल आणि ग्रँड सेंट्रल पार्क या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमीपूजन समारंभ तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्क आणि महा.ओओओ या संकेतस्थळाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. ठाण्याच्या महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुभाष भोईर, आमदार रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सिद्धाचल येथील वर्किंग वूमेन्स हॉस्टेलच्या भूमीपूजनाने झाली.
सोयीसुविधायुक्त सेंटर
बांधकाम विकास हस्तातंरणाच्या माध्यमातून 6 कोटी 75 लक्ष रूपये खर्च करून बांधण्यात येणार्या हॉस्टेलमध्ये एकूण 155 व्यक्ती राहू शकतील एवढी क्षमता आहे. त्याचबरोबर वाचन खोली, टीव्ही बघण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, कॅफेटेरिया सीसीटीव्ही आदी सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर जिम्नॅशिएम सेंटरचे भूमीपूजन केले. अंदाजे 27 कोटी रूपये खर्च खरून बांधकाम विकास हस्तातंरणाच्या माध्यमातून हे आर्टिस्टिक जिम्नॅशियम सेंटर बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, योगा कक्ष आणि 300 प्रेक्षक क्षमता असेलली गॅलरी आदी सुविधा असणार आहेत.
90 कोटींचा होणार खर्च
यावेळी कोलशेत रोड येथे बांधकाम विकास हस्तातंरणाच्या माध्यमातून बांधण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय ग्रँड सेंट्रल पार्कचे भूमीपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. खर्या अर्थाने ठाणे शहराच्या लौकिकात भर टाकणार्या हे सेंट्रल पार्क निर्माण करण्यासाठी 90 कोटी खर्च येणार आहे. बांधकाम विकास हस्तातंरणाच्या माध्यमातून 20.5 एकर जागेमध्ये हे सेंट्रल पार्क बांधण्यात येणार असून या ठिकाणी मुलांसाठी खेळण्याची जागा, थीम उद्यान, तलाव क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, आयकॉनिक पूल आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कम्यनिटी पार्कचे लोकार्पण होणार आहे. या ठिकाणी 400 मीटर जॉगिंग ट्रॅक, अॅम्पीथिएटर, खुली व्यायामशाळा, इलेव्हेटड वॉकवेज, मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र, योगा कोर्ट, लॉन आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
शिवसेना आयुक्तांच्या पाठीशी
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल ज्या धडाडीने काम करीत आहेत. ती धडाडी वाखाणण्याजोगी असल्याचे कौतुक करतानाच जयस्वाल यांच्या मागे शिवसेनी भक्कमपणे उभी राहील अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ग्रँड सेंट्रल पार्कच्या भूमीपूजन समारंभात बोलताना दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त ज्या गतीने काम करीत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची ज्या पद्धतीने ठाण्यात युती आहे त्याचा अभिमान असल्याचे सांगितले.