ठाण्यात चालक भरती प्रक्रियेला महापौरांनी दिली स्थगिती

0

ठाणे । ठाणे महापालिकेत नुकत्याच झालेल्या चालक भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून ही भरती प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी सोमवारच्या महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली. ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांना डावलले जात असल्याचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला. यावर प्रशासनाने भरती प्रक्रिया पारदर्शकपणे केल्याचा खुलासा केला. परंतु, सभागृहाची भावना लक्षात घेऊन जोपर्यंत भरतीमध्ये स्थानिकांना 50 टक्के आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री देत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित करावी असे, आदेश पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले.

काही ठराविक जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी दिली जात असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक नारायण पवार यांनी केला. दुसरीकडे बाहेरच्या जिल्ह्यात ज्या ज्या परीक्षा झाल्या, त्या ठिकाणी आपल्या पालिकेतील क्लास वन ऑफिसर, शासनाकडून आलेल्यांनी अधिकार्‍यानी स्वत: जाऊन, आपल्या जिल्ह्यातील उमेदवारांना अधिकचे मार्क्स द्यावेत अशी विनंती केली असल्याचा गौप्यस्फोट यावेळी शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी केला. या प्रक्रियेतच मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकप्रतिनिधींच्या या आरोपामुळे ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.

प्रक्रिया पारदर्शक झाल्याचा दावा
भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक झाली असून, कायद्याच्या चौकटीत राहूनच ती केल्याचे प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच अर्ज करतांना राज्यातील कोणत्याही ठिकाणचा उमेदवार करू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही आक्षेप असतील तर त्यानुसार पुढील कार्यवाही करू. परंतु, ती रद्द करू नका अशी विनंती त्यांनी केली. अखेर पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांना भरती प्रक्रियेत 50 टक्के आरक्षण देण्याचा जो प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घ्यावी, असे सांगून तो पर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले.